कोंडाईबारी घाटात ब्रेक फेल टँकरचा कहर; ४ ते ५ वाहनांना धडक, एकाचा जागीच मृत्यू

अल्टो कारवर टँकर उलटला; तिघे गंभीर जखमी, चालक अपघातानंतर पसार
धुळे : धुळे–सुरत राष्ट्रीय महामार्गावरील कोंडाईबारी घाटात ब्रेक फेल झालेल्या भरधाव टँकरने ४ ते ५ वाहनांना जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. त्यानंतर अनियंत्रित झालेला टँकर एका अल्टो कारवर उलटला. या दुर्घटनेत एकाचा जागीच मृत्यू, तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कोंडाईबारी घाटातून भरधाव वेगाने जात असताना टँकरचे ब्रेक फेल झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे चालकाचं टँकरवरील नियंत्रण सुटलं आणि टँकरने मार्गावरील ४ ते ५ वाहनांना धडक दिली. त्यानंतर समोरून येणाऱ्या एका अल्टो कारवर टँकर जाऊन उलटला.
या भीषण अपघातात सोनगड येथील रहिवासी शकील अब्दुल गफूर, वय ४३ वर्षे, यांचा जागीच मृत्यू झाला. तर अल्टो कारमधील इतर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच विसरवाडी पोलीस आणि महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरू केलं. टँकरखाली दबलेल्या कारमधील जखमींना क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर तिघांनाही तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

या अपघातामुळे धुळे–सुरत महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी आवश्यक कार्यवाही करत वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न केले.
दरम्यान, अपघातानंतर टँकर चालक घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती आहे. विसरवाडी पोलीस त्याचा शोध घेत असून, अपघात नेमका कशामुळे झाला आणि टँकरचा ब्रेक फेल होण्यामागचं कारण काय होतं, याचा तपास सुरू आहे.
कोंडाईबारी घाटातील या भीषण अपघातामुळे पुन्हा एकदा घाटमार्गावरील अवजड वाहनांची सुरक्षितता आणि ब्रेक यंत्रणेच्या तपासणीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.



