AmravatiamravatiamravatinewscitynewsLatest NewsMaharashtra

अमरावतीत बिगीलँडजवळ अवैध विदेशी दारूची वाहतूक; ६३ हजारांचा मुद्देमाल जप्त

नांदगाव पेठ पोलिसांची कारवाई; ४३ वर्षीय व्यक्तीविरोधात दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल

अमरावती : अमरावती शहरातील नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत बिगीलँड परिसरात अवैधरीत्या विदेशी दारूची वाहतूक करून विक्री करण्याच्या संशयावरून पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत एका ४३ वर्षीय व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं असून, त्याच्याकडून ६३ हजार रुपये किमतीची विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, ३ सप्टेंबर २०२६ रोजी नांदगाव पेठ पोलीस पथक परिसरात पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली. बिगीलँडजवळ एक व्यक्ती पिशव्यांमध्ये विदेशी दारू घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी बिगीलँड रोड परिसरात कारवाई केली. यावेळी एक व्यक्ती पिशव्या घेऊन उभा असल्याचं आढळून आलं. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पिशव्यांची झडती घेतली असता रॉयल स्टॅग आणि रॉयल चॅलेंज ब्रँडची विदेशी दारू आढळून आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रॉयल स्टॅग २ लिटरच्या २५ बाटल्या, ज्यांची किंमत ४५ हजार रुपये, तर रॉयल चॅलेंज २ लिटरच्या १० बाटल्या, ज्यांची किंमत १८ हजार रुपये आहे, असा एकूण ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचं नाव नरेश कुमार पारसमल चौपडा, वय ४३ वर्षे, असं असून तो साऊथ गोवा जिल्ह्यातील डोंगरवाडा येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

याप्रकरणी नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३७९/२०२६, महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलम ६५(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त यशवंत सोलंके आणि सहायक पोलीस आयुक्त नयन आलुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुनीत कुलट यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

कारवाईत पोलीस उपनिरीक्षक गणेश राऊत, पोलीस उपनिरीक्षक ओमप्रकाश देशमुख, पोलीस उपनिरीक्षक दिनेश माणुसमारे यांच्यासह पोलीस कर्मचारी सहभागी झाले.

नांदगाव पेठ पोलिसांच्या या कारवाईमुळे बिगीलँड परिसरातील अवैध दारू विक्री आणि वाहतुकीवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारल्याचं दिसून येत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button