citynewsLatest NewsMaharashtraNanded

मराठा आरक्षणासाठी नांदेडमध्ये रास्ता रोको; मुदखेडमध्ये महामार्ग रोखला

मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ जिल्हा बंदची हाक; लोकप्रतिनिधींना ठोस पाठपुराव्याचा इशारा

नांदेड : मराठा आरक्षणाच्या मागणीवरून नांदेड जिल्ह्यात पुन्हा एकदा आंदोलनाला जोर आला आहे. मुदखेड येथे सकल मराठा समाजाच्या वतीने नांदेड–उमरी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. आंदोलकांनी महामार्गावर ठिय्या देत जोरदार घोषणाबाजी केली.

मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ नांदेड जिल्हा बंदची हाक देण्यात आली असून, आरक्षणाच्या मागणीबाबत सरकारने तातडीने आणि गांभीर्याने निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.

मुदखेडमधील आंदोलनादरम्यान मोठ्या संख्येने मराठा समाजबांधव रस्त्यावर उतरले. आरक्षणाच्या मागणीसाठी सरकारने ठोस भूमिका घ्यावी, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली. या आंदोलनाला नागरिकांसह पोलिसांचंही सहकार्य मिळत असल्याचं आंदोलकांनी सांगितलं.

दरम्यान, आंदोलकांनी स्थानिक आमदार, खासदार आणि इतर लोकप्रतिनिधींवरही निशाणा साधला. केवळ सोशल मीडियावर पोस्ट करून मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर भूमिका मांडण्याऐवजी लोकप्रतिनिधींनी थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घ्यावी, लेखी निवेदन द्यावं आणि आरक्षणाच्या मागणीसाठी ठोस पाठपुरावा करावा, अशी मागणी करण्यात आली.

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांनी लोकप्रतिनिधींना स्पष्ट इशाराही दिला आहे. मराठा समाजाचं सहकार्य हवं असेल, तर समाजाच्या मागण्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहावं; अन्यथा संबंधित लोकप्रतिनिधींच्या विरोधात प्रचार करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला.

रास्ता रोको आंदोलनामुळे नांदेड–उमरी महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून आवश्यक खबरदारी घेण्यात आली.

महामार्गावरील रास्ता रोको, जिल्हा बंदची हाक आणि लोकप्रतिनिधींना देण्यात आलेला इशारा यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आता सरकार या आंदोलनाची किती गांभीर्याने दखल घेतं आणि पुढील काळात आंदोलनाला कोणतं वळण मिळतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button