citynewsLatest NewsMaharashtraMumbai

वाशी मनपा रुग्णालयात एक्सपायर्ड सलाईन लावल्याचा आरोप; रुग्णाची प्रकृती खालावल्याचा दावा

५० वर्षीय रुग्णाला फोर्टिस रुग्णालयात हलवलं; संतप्त नातेवाईकांचं वैद्यकीय अधीक्षकांच्या दालनात ठिय्या आंदोलन

नवी मुंबई : नवी मुंबईतील वाशी मनपा रुग्णालयात रुग्णाला कथितरीत्या मुदत संपलेली सलाईन लावल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. सलाईन लावल्यानंतर रुग्णाची प्रकृती खालावल्याचा दावा नातेवाईकांनी केला असून, या प्रकारामुळे संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी रुग्णालय प्रशासनाविरोधात आंदोलन सुरू केलं आहे.

वाशी मनपा रुग्णालयात ५० वर्षीय गोपीराम खडसे यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांना लावण्यात आलेल्या सलाईनची एक्सपायरी तारीख जुलै २०२६ असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

सलाईन मुदतबाह्य असल्याचं लक्षात आल्यानंतर नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाला जाब विचारला. त्यानंतर गोपीराम खडसे यांची प्रकृती खालावल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. त्यांना पुढील उपचारासाठी फोर्टिस रुग्णालयात हलवण्यात आलं असून, सध्या त्यांची प्रकृती नाजूक असल्याचं नातेवाईकांकडून सांगण्यात येत आहे.

या प्रकारामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी संबंधित डॉक्टर, नर्स आणि दोषी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. दोषींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा देत नातेवाईकांनी वैद्यकीय अधीक्षकांच्या दालनात ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे.

दरम्यान, या प्रकरणातील आरोपांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. रुग्णाची प्रकृती नेमकी कशामुळे खालावली आणि संबंधित सलाईनची मुदत खरंच संपलेली होती का, याची चौकशी होणं महत्त्वाचं आहे.

विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रकरणावर वाशी मनपा रुग्णालय प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे चौकशीनंतरच या प्रकरणातील नेमकी वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.

रुग्णालयातील औषध आणि वैद्यकीय साहित्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न या घटनेमुळे ऐरणीवर आला असून, प्रशासन या आरोपांची चौकशी करून दोषींवर कारवाई करणार का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button