AmravatiamravatinewscitynewsLatest NewsMaharashtra

अमरावतीत सफाई कामगारांच्या प्रश्नांवर महामंथन; महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची बैठक संपन्न

हक्क, सेवा-सुविधा, रोजगार आणि सामाजिक सुरक्षेवर चर्चा; आगामी आंदोलनांचीही दिशा ठरवली

अमरावती : अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटनेची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी बैठक अमरावतीत पार पडली. सोमवारी, ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सुयोग मंगल कार्यालयात झालेल्या या बैठकीत राज्यातील सफाई कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीला संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंदजी परमार, राष्ट्रीय महामंत्री सुधाकरजी पाणीकर, सोहनसिंगजी वाल्मीकि, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष दिलीपजी चांगरे यांच्यासह राज्यातील विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीमध्ये राज्यातील सफाई कामगारांचे हक्क, न्याय, सेवा-सुविधा, रोजगार आणि सामाजिक सुरक्षा यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. विविध जिल्ह्यांमध्ये सफाई कामगारांना भेडसावणाऱ्या समस्या तसेच शासन आणि प्रशासन स्तरावर प्रलंबित असलेल्या मागण्यांचा आढावाही घेण्यात आला.

सफाई कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शासन आणि प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यासोबतच संघटनेची पुढील दिशा आणि धोरण निश्चित करण्यात आलं. आगामी काळात राबवण्यात येणाऱ्या आंदोलनात्मक आणि सामाजिक उपक्रमांबाबतही बैठकीत चर्चा झाली.

राज्यातील सफाई कामगारांना त्यांच्या कामाच्या अनुषंगाने आवश्यक सेवा-सुविधा आणि सामाजिक सुरक्षेचा लाभ मिळावा, तसेच प्रलंबित प्रश्नांवर शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, यासाठी संघटना पुढील काळात अधिक आक्रमकपणे पाठपुरावा करणार असल्याची भूमिका बैठकीत मांडण्यात आली.

बैठकीचे संचालन प्रदेश महामंत्री पी. बी. भातकुळे यांनी केले, तर प्रदेश अध्यक्ष दिलीपजी चांगरे यांनी सभेची प्रस्तावना मांडली. अमरावती जिल्हाध्यक्ष संजयजी हडाले यांनी उपस्थितांचे आभार मानले.

सकाळी साडेअकरा ते दुपारी चार वाजेपर्यंत ही बैठक पार पडली.

सफाई कामगारांच्या हक्क आणि प्रलंबित मागण्यांसाठी आता संघटना कोणती पावलं उचलणार आणि शासन-प्रशासनाकडून या मागण्यांवर काय निर्णय घेतला जाणार, याकडे सफाई कामगारांचं लक्ष लागलं आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button