
अंतरवाली सराटीतील आमरण उपोषणाला पाठिंबा; सकल मराठा समाजाचे संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्याचे आवाहन
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी येथील आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुका उद्या कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय सकल मराठा समाजाच्या वतीने घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू असून, त्यांच्या प्रकृतीबाबत मराठा समाजाकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी हदगाव तालुक्यातील सकल मराठा समाजाने बंदचे आवाहन केले आहे.
दरम्यान, हदगाव तालुक्यात दत्ता पाटील हडसणीकर, लक्ष्मण पाटील रुईकर आणि ओमप्रकाश पाटील कदम यांचेही उपोषण सुरू आहे. या स्थानिक उपोषणांनाही पाठिंबा देण्यासाठी उद्या संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती मराठा समन्वयक माधवराव पाटील देवसरकर यांनी दिली.
सकल मराठा समाजाच्या बंदच्या आवाहनानंतर हदगाव तालुक्यातील बाजारपेठ आणि शहरातील दैनंदिन व्यवहारांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाच्या भूमिकेकडेही लक्ष लागले आहे.



