मोर्शी तालुक्यात वाघाचा वावर; नया वाठोडा परिसरात वाघ दिसल्याने शेतकऱ्यांमध्ये खळबळ

प्रकाश टेकाडे यांच्या शेतात वाघाचे दर्शन; वाघिणीच्या पाऊलखुणाही आढळल्या, नेर पिंगळाई-लिहिदा परिसरातील शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा
मोर्शी : अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात नया वाठोडा परिसरात वाघ दिसून आल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. शेतकरी प्रकाश टेकाडे यांच्या शेतात वाघ दिसल्याची माहिती समोर आली असून, याच परिसरात वाघिणीच्या पाऊलखुणाही आढळल्याचे सांगण्यात येत आहे.
वाघाच्या उपस्थितीमुळे नया वाठोडासह नेर पिंगळाई, लिहिदा आणि आसपासच्या गावांतील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतीची कामे सुरू असताना वाघाचा वावर आढळल्याने शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
शेतशिवारात वाघिणीच्या पाऊलखुणा आढळल्याने परिसरात आणखी एक वाघ किंवा वाघीण असण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांनी एकट्याने शेतात जाऊ नये, शक्यतो समूहानेच शेतात जावे आणि शेतशिवारात जाताना विशेष सतर्कता बाळगावी, असे सांगण्यात आले आहे. तसेच वाघ दिसल्यास त्याच्या जवळ जाण्याचा किंवा त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न न करता तातडीने संबंधित यंत्रणेला माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, वाघाच्या दर्शनाच्या वृत्तामुळे नया वाठोडा आणि परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, वनविभागाने या भागात गस्त वाढवून वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवावे, अशी मागणी शेतकरी आणि ग्रामस्थांकडून केली जात आहे.



