ठाण्याच्या खाडीत पोहायला गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू; चार तासांच्या शोधमोहिमेनंतर मृतदेह बाहेर

रेतीबंदर गणेश विसर्जन घाटाजवळ दुर्घटना; मुंब्र्यातील तिघांचा दुर्दैवी अंत, कळवा पोलिसांकडून तपास सुरू
ठाणे : ठाण्यातील रेतीबंदर येथील गणेश विसर्जन घाटाजवळ खाडीत पोहण्यासाठी उतरलेल्या तीन जणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रविवारी, ३० ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंब्रा येथील ठाकूरपाडा परिसरातील तीन जण खाडीत पोहण्यासाठी उतरले होते. मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तिघेही पाण्यात बुडाले. दुपारी सुमारे ३ वाजून ८ मिनिटांनी तीन जण खाडीत बुडाल्याची माहिती प्रशासनाला मिळाली.
घटनेची माहिती मिळताच कळवा पोलीस, नारपोली पोलीस, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि ठाणे आपत्ती प्रतिसाद दल म्हणजेच TDRF यांची पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली.
तिघांचा शोध घेण्यासाठी बचाव पथकांनी खाडीत शोधमोहीम सुरू केली. तब्बल चार तासांच्या अथक शोधमोहिमेनंतर TDRF जवानांनी तिघांना पाण्याबाहेर काढले. त्यानंतर तिघांनाही रुग्णवाहिकेतून छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे उपचारासाठी नेण्यात आले.
मात्र रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तिघांनाही मृत घोषित केले. मृतांची ओळख ४२ वर्षीय आलम सय्यद, ४२ वर्षीय रिझवान सय्यद आणि ३० वर्षीय साहिल पोलंदास अशी झाली आहे. तिघेही मुंब्रा येथील ठाकूरपाडा परिसरातील रहिवासी असल्याची माहिती आहे.
या घटनेनंतर रेतीबंदर परिसरात शोककळा पसरली असून, खाडी परिसरात पोहण्यासाठी उतरणाऱ्यांनी सुरक्षेची विशेष काळजी घेण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.
दरम्यान, या दुर्घटनेप्रकरणी कळवा पोलीस पुढील तपास करत आहेत. नेमक्या परिस्थितीत तिघे खाडीत उतरले आणि दुर्घटना कशी घडली, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.



