नवोदय विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

मैदानात वाढलेले गवत आणि कचऱ्याचे साम्राज्य; साप आढळल्याने पालकांमध्ये भीती, गरम पाणी, जनरेटर आणि भोजनाच्या गुणवत्तेबाबतही तक्रारी
गोंदिया | प्रतिनिधी
गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध येथील पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. विद्यालयाच्या मैदानात मोठ्या प्रमाणात गवत वाढले असून कचऱ्यामुळे अस्वच्छ परिस्थिती निर्माण झाल्याची तक्रार पालकांकडून करण्यात आली आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी याच परिसरात साप आढळल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत पालकांमध्ये चिंता वाढली आहे.
विद्यालयाच्या खेळाच्या मैदानात वाढलेले गवत आणि कचऱ्यामुळे विद्यार्थ्यांना धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. विशेष म्हणजे मैदान परिसरात साप आढळून आल्याने हा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही अनुचित घटना घडली नाही. मात्र, एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे.
यासोबतच पावसाळ्यात विद्यार्थ्यांना गरम पाण्याऐवजी थंड पाण्याने आंघोळ करावी लागत असल्याची तक्रारही समोर आली आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यास पर्यायी जनरेटरची पुरेशी व्यवस्था नसल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
विद्यालयातील भोजनाच्या गुणवत्तेबाबतही पालकांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देताना प्रशासनाकडून पुरेशी काळजी घेतली जात आहे का, असा सवाल आता उपस्थित होत आहे.
मैदानातील वाढलेले गवत, कचरा आणि सापांचा वावर हा केवळ स्वच्छतेचा प्रश्न नसून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी संबंधित गंभीर मुद्दा असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विद्यालयाची तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीची वस्तुस्थिती तपासावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
विद्यालय परिसराची तातडीने स्वच्छता करणे, मैदानातील धोकादायक गवत आणि कचरा हटवणे, वीजपुरवठ्यासाठी पर्यायी व्यवस्था करणे आणि भोजनाची गुणवत्ता तपासणे, या उपाययोजना तातडीने करण्याची गरज असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड होण्यापूर्वी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे. दरम्यान, या तक्रारींची वरिष्ठ पातळीवर चौकशी होऊन विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा आणि सुरक्षित वातावरण मिळणार का, याकडे आता पालकांचे लक्ष लागले आहे.



