प्रश्नपत्रिका फुटीच्या निषेधार्थ अमरावतीत विद्यार्थ्यांचा मोर्चा

इरविन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली; शिक्षण व्यवस्थेतील सुधारणा आणि निष्पक्ष चौकशीची मागणी
अमरावती | प्रतिनिधी
देशभरात विविध स्पर्धा व प्रवेश परीक्षांशी संबंधित प्रश्नपत्रिका फुटीच्या कथित घटनांविरोधात अमरावतीतील विद्यार्थ्यांनी मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. इरविन चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चात शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेत शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाची मागणी केली.
हातात फलक आणि बॅनर घेऊन विद्यार्थ्यांनी शिक्षण व्यवस्थेशी संबंधित विविध मुद्द्यांवर घोषणाबाजी केली. आंदोलनादरम्यान काही विद्यार्थ्यांनी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला.
आंदोलनकर्त्यांचे म्हणणे होते की, प्रश्नपत्रिका फुटीच्या घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर आणि भवितव्यावर परिणाम होत आहे. परीक्षा पुढे ढकलल्या जाणे, पुन्हा परीक्षा घेण्याची वेळ येणे आणि निकालांमध्ये होणारा विलंब यामुळे विद्यार्थ्यांवर मानसिक तसेच शैक्षणिक ताण वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले.
मोर्चादरम्यान विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रत्येक प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची, दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याची आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रभावी व पारदर्शक परीक्षा व्यवस्था उभारण्याची मागणी केली.
यावेळी काही आंदोलनकर्त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणीही केली.
मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनामार्फत शासनाकडे पाठविण्यासाठी सादर केले. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.
शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता, परीक्षांची विश्वासार्हता आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या आंदोलनानंतर शासन आणि संबंधित यंत्रणा कोणती पावले उचलतात, याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले आहे.



