पावसाअभावी नांदेडमध्ये सोयाबीन पीक संकटात

अर्धापूर तालुक्यातील शेलगावातील शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान होण्याची भीती; कोरडा दुष्काळ जाहीर करून मदतीची मागणी
अर्धापूर (नांदेड) | प्रतिनिधी
नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील सोयाबीन पीक संकटात सापडले आहे. शेलगाव येथील शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन वाळू लागल्याने लाखोंची गुंतवणूक धोक्यात आली असून शासनाने तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
शेलगाव येथील शेतकरी महेश राजेगोरे यांनी पाच एकर क्षेत्रात सोयाबीनची पेरणी केली होती. मशागत, बियाणे, खते आणि फवारणीसाठी त्यांनी सुमारे एक ते सव्वा लाख रुपये खर्च केले. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून समाधानकारक पाऊस न झाल्याने पिकाची वाढ खुंटली असून अनेक ठिकाणी सोयाबीनची झाडे वाळण्यास सुरुवात झाली आहे.
शेतकऱ्यांच्या मते, वेळेवर पाऊस झाला असता या पिकातून अडीच ते तीन लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, सध्याच्या परिस्थितीमुळे उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून किंवा उसनेवारी करून खरीप हंगामासाठी गुंतवणूक केली आहे. त्यामुळे पाऊस न झाल्यास त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर शासनाने परिस्थितीची तातडीने दखल घेऊन प्रभावित भागात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून हेक्टरी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी आणि स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
सध्या शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले असून आगामी काही दिवसांत समाधानकारक पाऊस झाला नाही तर खरीप हंगामावर मोठे संकट ओढवण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शासनाने तातडीने मदतीचा हात पुढे करावा, अशी अपेक्षा शेलगावसह संपूर्ण परिसरातील शेतकरी व्यक्त करत आहेत.



