सोनम वांगचूक यांच्या समर्थनार्थ मानोरात आक्रोश रॅली

विद्यार्थी, पालक आणि विविध संघटनांचा उत्स्फूर्त सहभाग; राष्ट्रपतींना निवेदन सादर
मानोरा (वाशिम) | प्रतिनिधी
दिल्लीतील जंतरमंतर येथे उपोषण करणारे लडाखचे शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या समर्थनार्थ वाशिम जिल्ह्यातील मानोरा शहरात सोमवारी भव्य आक्रोश रॅली काढण्यात आली. विद्यार्थी, पालक, सामाजिक संघटना, पत्रकार आणि नागरिकांच्या मोठ्या सहभागामुळे या आंदोलनाकडे परिसराचे लक्ष वेधले गेले.
विद्यार्थी एकता संघ, मानोरा यांच्या नेतृत्वाखाली सकाळी पंचायत समिती कार्यालयापासून आक्रोश रॅलीला प्रारंभ झाला. शहरातील विविध मार्गांवरून मार्गक्रमण करत मोर्चा तहसील कार्यालयावर पोहोचला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करत आपल्या मागण्यांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
तहसील कार्यालयात आंदोलकांच्या शिष्टमंडळाने तहसीलदारांमार्फत भारताच्या राष्ट्रपतींना निवेदन सादर केले. निवेदनामध्ये लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची तसेच लडाखचा संविधानाच्या सहाव्या परिशिष्टात समावेश करण्याची मागणी करण्यात आली.
याशिवाय, आंदोलनादरम्यान काही आंदोलकांनी नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशीही मागणी केली.
आंदोलनकर्त्यांनी इशारा देत म्हटले की, त्यांच्या मागण्यांकडे सरकारने गांभीर्याने लक्ष न दिल्यास १५ ऑगस्टपासून देशव्यापी आंदोलन आणि उपोषण करण्यात येईल.
रॅली शांततेत पार पडली. या आंदोलनातून लडाखसंदर्भातील मागण्यांना मानोरातून पाठिंबा व्यक्त करण्यात आला असून, या मागण्यांबाबत केंद्र सरकार पुढे काय भूमिका घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.



