AmravatiAmravatiMunicipalCorporationcitynewsLatest NewsMaharashtra

अमरावतीत भटक्या कुत्र्याचा ९ वर्षीय चिमुरडीवर जीवघेणा हल्ला

रुक्मिणी नगरातील घटना; चेहऱ्यावर गंभीर चावे, उपचार सुरू – भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणावर मनपावर पुन्हा प्रश्नचिन्ह

अमरावती | प्रतिनिधी

अमरावती शहरातील रुक्मिणी नगर परिसरात भटक्या कुत्र्याने अवघ्या ९ वर्षीय चिमुरडीवर केलेल्या हल्ल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात सनीदी सचिन कावरे ही गंभीर जखमी झाली असून तिच्या चेहऱ्यासह शरीराच्या विविध भागांवर कुत्र्याने चावे घेतले आहेत. तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर शहरातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येबाबत आणि त्यावरील नियंत्रणासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित होत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सनीदी ही शेजारच्या घरातून स्वतःच्या घरी परतत असताना अचानक एका मोकाट कुत्र्याने तिच्यावर हल्ला केला. हल्ला इतका भीषण होता की, कुत्र्याने तिच्या चेहऱ्यावर आणि शरीराच्या विविध भागांवर अनेक ठिकाणी चावे घेतले. नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मुलीची सुटका केली आणि तिला उपचारासाठी रेडीयंट हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

घटनेची माहिती मिळताच आमदार रवी राणा, माजी महापौर संजय खोडके, महापौर श्रीचंद तेजवानी, उपमहापौर सचिन भेंडे, महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंडावले यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी रुग्णालयात दाखल झाले. यावेळी आमदार रवी राणा यांनी जखमी मुलीच्या उपचाराचा संपूर्ण खर्च उचलण्याची घोषणा केली तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली.

दरम्यान, महानगरपालिका आयुक्तांनी शहरभर भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी विशेष मोहीम राबविण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, या घटनेनंतर महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

यापूर्वी एप्रिल महिन्यात झालेल्या महानगरपालिका आमसभेत काँग्रेसचे स्वीकृत सदस्य अनिल अग्रवाल यांनी भटक्या कुत्र्यांच्या नसबंदी मोहिमेतील कथित अनियमिततेचा मुद्दा उपस्थित केला होता. मोठ्या प्रमाणावर नसबंदी झाल्याचा दावा केला जात असताना शहरातील मोकाट कुत्र्यांची संख्या कमी का होत नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. त्यानंतरही ठोस उपाययोजना झाल्याचे दिसून न आल्याने या घटनेनंतर हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

नागरिकांकडून आणखी एक तक्रार पुढे आली असून, मनपाने भटक्या कुत्र्यांबाबत तक्रारी नोंदविण्यासाठी जाहीर केलेल्या काही संपर्क क्रमांकांवर प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, शहरातील विविध भागांमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर प्रशासन केवळ आश्वासनांपुरते मर्यादित राहणार की भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी प्रभावी आणि दीर्घकालीन उपाययोजना राबविणार, याकडे संपूर्ण अमरावतीकरांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button