अमरावती ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, ११ आरोपी अटकेत

सायबर गुन्हेगारांविरोधात अमरावती ग्रामीण पोलिसांनी मोठी आणि धडाकेबाज कारवाई करत एका संघटित टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तब्बल ११ आरोपींना अटक करण्यात आली असून, कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक व्यवहारांचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे.
पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईदरम्यान सायबर फसवणुकीसाठी वापरण्यात येणारे मोठ्या प्रमाणातील साहित्य जप्त करण्यात आले. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपींनी विविध बँक खात्यांच्या माध्यमातून सुमारे ६ कोटी २५ लाख रुपयांपेक्षा अधिक आर्थिक व्यवहार केल्याचे उघड झाले आहे.
पोलिसांनी आरोपींकडून ६४ पासबुक, २४७ एटीएम कार्ड, १२८ सिम कार्ड, ५२ मोबाईल हँडसेट, एक लॅपटॉप आणि तीन टॅबलेट जप्त केले आहेत. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत १० लाख ६८ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
तपासादरम्यान आरोपींकडून वापरण्यात आलेली ६४ बँक खातीही समोर आली असून, ती गोठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणातील काही व्यवहार राज्याबाहेरील सायबर फसवणुकीच्या तक्रारींशी संबंधित असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
दरम्यान, या टोळीचा मुख्य सूत्रधार अद्याप फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत आहेत. सायबर गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी नागरिकांना सायबर सुरक्षेबाबत विशेष सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. आपला ओटीपी, पिन, पासवर्ड किंवा बँक खात्याची माहिती कोणाशीही शेअर करू नये. तसेच आधार कार्ड, एटीएम कार्ड किंवा बँक खाते भाड्याने देण्याच्या आमिषाला बळी पडू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे.
ऑनलाईन गुंतवणूक, शेअर मार्केट, गेमिंग किंवा डिजिटल अटक यांसारख्या फसवणुकीच्या प्रकारांपासून सावध राहण्याचा सल्ला पोलिसांनी दिला आहे. कोणतीही संशयास्पद आर्थिक हालचाल आढळल्यास तात्काळ बँक आणि पोलिसांशी संपर्क साधावा, असेही सांगण्यात आले आहे.
सायबर गुन्हेगार कितीही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत असले तरी कायद्याचे हात त्यांच्यापर्यंत पोहोचतातच, हे अमरावती ग्रामीण पोलिसांच्या या कारवाईतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.



