agricultureAmravaticitynewsLatest NewsMaharashtra

ट्रॅक्टरच्या स्टेअरिंगवर आमदार रवी राणा; शेतकऱ्यांना दिला महत्त्वाचा सल्ला – घाईघाईने पेरणी करू नका!

अमरावती | प्रतिनिधी

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर आमदार रवी राणा यांनी आज माळेगाव येथील आपल्या शेतात प्रत्यक्ष ट्रॅक्टर चालवत नांगरणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत यंदाच्या पावसाच्या परिस्थितीबाबत महत्त्वाचा सल्ला दिला.

माळेगाव परिसरातील शेतात नांगरणी करताना रवी राणा यांनी सांगितले की, अनेक शेतकरी पहिल्या पावसानंतर पेरणी करतात. मात्र त्यानंतर पावसात खंड पडल्यास दुबार पेरणीची वेळ येते आणि त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते.

यंदा मान्सूनला काहीसा विलंब होण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने शेतकऱ्यांनी संयम बाळगणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. पुरेशा पावसाची खात्री झाल्यानंतरच पेरणीचा निर्णय घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

तसेच बियाणे, खत आणि शेतीसाठी लागणारी इतर सर्व तयारी पूर्ण ठेवावी, मात्र केवळ पहिल्या पावसावर विश्वास ठेवून पेरणी करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दुबार पेरणीमुळे बियाणे, मजुरी आणि इतर खर्च वाढतो. त्यामुळे योग्य वेळ साधून केलेली पेरणीच शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

खरीप हंगामाच्या तोंडावर आमदार रवी राणा यांनी शेतकऱ्यांना सावधगिरीचा सल्ला देत हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन नियोजनबद्ध पद्धतीने पेरणी करण्याचे आवाहन केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button