कारंजा-अमरावती महामार्गावर भीषण अपघात!

कारंजा-अमरावती महामार्गावर दोन चारचाकी वाहनांची भीषण धडक; एक वाहन ३ ते ४ वेळा पलटी, सुदैवाने जीवितहानी टळली
कारंजा | प्रतिनिधी
कारंजा-अमरावती महामार्गावर आज एक भीषण अपघात घडला असून मद्यधुंद चालकाच्या कथित बेजबाबदारपणामुळे दोन चारचाकी वाहनांमध्ये झालेल्या जोरदार धडकेत एक वाहन तब्बल तीन ते चार वेळा पलटी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमरावतीच्या दिशेने येणाऱ्या एका चारचाकी वाहनाचा चालक मद्याच्या नशेत वाहन चालवत होता. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित चालक भरधाव वेगाने वाहन चालवत इतर वाहनांना वारंवार कट मारत पुढे जात होता.
दरम्यान, विळेगाव ते खेरडा दरम्यान वाहनावरील नियंत्रण सुटल्याने समोरून येणाऱ्या दुसऱ्या चारचाकी वाहनाला जोरदार धडक बसली. धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की एका वाहनाने रस्त्यावरच तीन ते चार पलट्या मारल्या.
अपघातानंतर घटनास्थळी काही काळ भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. दोन्ही वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला असून वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच कारंजा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत दोन्ही अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेतली आणि पुढील तपासासाठी कारंजा ग्रामीण पोलीस ठाण्यात जमा केली.
या भीषण अपघातात दोन्ही वाहनांतील सर्व प्रवासी सुदैवाने सुरक्षित बचावले असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र अपघाताचे दृश्य पाहून उपस्थित नागरिकही हादरले.
दरम्यान, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणाऱ्या चालकांच्या बेजबाबदारपणामुळे महामार्गांवरील अपघातांचे प्रमाण वाढत असल्याची चिंता नागरिकांनी व्यक्त केली आहे. संबंधित चालकाविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणीही जोर धरत आहे.
सध्या कारंजा ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून अपघातामागील सर्व बाबींची सखोल चौकशी सुरू आहे.



