नागपुरात फूड डिलिव्हरी बॉयवर चाकूचा धाक; तिघांनी केली लूट

मेडिकल चौक परिसरातील घटना सीसीटीव्हीत कैद; मोबाईल आणि रोख रक्कम लंपास, आरोपींचा शोध सुरू
नागपूर | प्रतिनिधी
नागपूर शहरात पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. मेडिकल चौक परिसरात एका फूड डिलिव्हरी बॉयला चाकूचा धाक दाखवत तीन अज्ञात भामट्यांनी लुटल्याची घटना घडली असून या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित डिलिव्हरी बॉय आपली ऑर्डर पूर्ण करून रात्री उशिरा घरी परतत होता. त्यावेळी राजाबक्षा हनुमान मंदिराजवळ दुचाकीवरून आलेल्या तीन युवकांनी त्याचा पाठलाग केला.
काही अंतरावर त्याला अडवत आरोपींनी चाकूचा धाक दाखवला आणि त्याच्याकडील मोबाईल फोन तसेच सुमारे तीन हजार रुपये रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून घेतली. लूटमार केल्यानंतर तिन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.
विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. व्हायरल होत असलेल्या फुटेजमध्ये संशयित युवकांच्या हालचाली स्पष्टपणे दिसून येत असल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेनंतर पीडित तरुणाने इमामवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी लुटमारीचा गुन्हा नोंदवत तपासाला सुरुवात केली असून सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे.
दरम्यान, शहरातील प्रमुख चौकांमध्ये अशा प्रकारच्या घटना घडत असल्याने रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त किती प्रभावी आहे, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
या घटनेमुळे रात्री उशिरापर्यंत काम करणारे फूड डिलिव्हरी बॉईज, कॅब चालक आणि इतर सेवा क्षेत्रातील कर्मचारी यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आरोपींना तातडीने अटक करून अशा घटनांवर आळा घालावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.



