citynewsLatest NewsMaharashtraNagpurNagpur graminNagpurPolice

फुटाळा तलावावर आपत्ती व्यवस्थापनाचा थरार! संयुक्त रेस्क्यू मॉक ड्रिलमध्ये सहा जणांची यशस्वी सुटका

नागपूर शहरातील प्रसिद्ध फुटाळा तलाव परिसर आज सकाळी आपत्कालीन बचाव कार्याच्या थरारक प्रात्यक्षिकांचा साक्षीदार ठरला. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाच्या निर्देशानुसार विविध आपत्कालीन यंत्रणांनी संयुक्तपणे भव्य रेस्क्यू मॉक ड्रिलचे आयोजन केले. आपत्तीच्या प्रसंगी नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी आणि विविध विभागांमधील समन्वय अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने हा सराव करण्यात आला.

12 जून 2026 रोजी सकाळी 8 वाजता फुटाळा तलाव येथे आयोजित या मॉक ड्रिलमध्ये नागपूर महानगरपालिकेचा अग्निशमन विभाग, एनडीआरएफ, एसडीआरएफ, एमएडीसी तसेच आपदा मित्र यांच्या पथकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. आपत्कालीन परिस्थितीत जलद आणि समन्वयित मदतकार्य कसे करायचे याचे प्रात्यक्षिक यावेळी सादर करण्यात आले.

मॉक ड्रिलदरम्यान विविध पथकांना वेगवेगळ्या प्रकारच्या आपत्तीजन्य परिस्थिती हाताळण्याचे टास्क देण्यात आले होते. नागपूर अग्निशमन विभागाने दोन बोटींच्या सहाय्याने तलावात अडकलेल्या सहा बाधित व्यक्तींचे यशस्वी रेस्क्यू करून दाखवले.

या बचाव मोहिमेत एका हृदयविकाराच्या रुग्णाची, एका सर्पदंश झालेल्या व्यक्तीची तसेच चार वृद्ध नागरिकांची सुरक्षित सुटका करण्यात आली. त्यानंतर सर्व बाधितांना मेडिकल फर्स्ट रिस्पॉन्स टीमकडे उपचारासाठी सुपूर्द करण्यात आले.

ही संपूर्ण संयुक्त मॉक ड्रिल मुख्य अग्निशमन अधिकारी तुषार बाराहाते, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाचे अंकुश गावंडे, एमएडीसीचे मुख्य अग्निशमन अधिकारी गणेश खरटमल, एनडीआरएफचे ब्रिजेश यादव आणि एसडीआरएफचे सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडली.

यावेळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी दिलीप चव्हाण, प्रभारी उपअधिकारी रवी मरसकोल्हे, सुरेश आत्राम, रुपेश मानके यांच्यासह आपत्ती व्यवस्थापन विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपत्तीच्या काळात जीवितहानी टाळण्यासाठी, बचाव कार्याची गती वाढवण्यासाठी आणि विविध यंत्रणांमधील समन्वय मजबूत करण्यासाठी अशा प्रकारच्या संयुक्त मॉक ड्रिल अत्यंत महत्त्वाच्या ठरतात, असे मत यावेळी अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

नागरिकांच्या सुरक्षेसाठी सज्ज असलेल्या विविध यंत्रणांनी दिलेले हे प्रात्यक्षिक म्हणजे कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासन पूर्णपणे तयार असल्याचा संदेशच होता.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button