City CrimecitynewsCrime NewsLatest NewsMaharashtraNagpurNagpurCrimeNagpurPolice

नागपुरात हिट अँड रनचा कहर! 72 वर्षीय वृद्धाचा बळी; पाच दिवसांनंतरही आरोपी फरार

भरधाव चारचाकीची जोरदार धडक; कुटुंबीयांचा पोलिस तपासावर सवाल

नागपूर शहरात पुन्हा एकदा बेदरकार वाहनचालकामुळे एका निष्पाप नागरिकाचा बळी गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बडकस चौक परिसरात भरधाव चारचाकी वाहनाने 72 वर्षीय वृद्धाला चिरडल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र या घटनेला पाच दिवस उलटूनही आरोपी चालक पोलिसांच्या हाती लागलेला नसल्याने कुटुंबीयांसह नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

नागपूरच्या बडकस चौक परिसरात रविवारी पहाटे ही भीषण दुर्घटना घडली. मृतक मुकुंद बाभरे हे पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास गजानन मंदिर परिसरातून पायी जात होते. यावेळी भरधाव वेगाने आलेल्या एका अनियंत्रित चारचाकी वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली.

धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की मुकुंद बाभरे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेत त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतरही त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर कुटुंबीयांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला असला तरी पाच दिवस उलटूनही आरोपी चालकाचा शोध लागलेला नाही, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

धक्कादायक बाब म्हणजे अपघात घडल्यानंतर चालकाने जखमी वृद्धाला मदत करण्याऐवजी घटनास्थळावरून पलायन केले. त्यामुळे या प्रकरणाविषयी नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. आरोपीला तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू ठेवला आहे. संबंधित वाहनाचा शोध घेण्यासाठी विविध पथके कामाला लागली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. मात्र अद्याप आरोपीपर्यंत पोहोचण्यात यश आलेले नाही.

एका निष्पाप वृद्धाचा जीव घेणारा बेदरकार चालक अखेर पोलिसांच्या जाळ्यात कधी अडकणार, याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. या प्रकरणात पोलिस तपासाची गती वाढवून आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी जोर धरत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button