citynewsLatest NewsMaharashtraNagpurNagpurCrimeNagpurPolice

नागपुरात एमडी पावडर रॅकेटचा पर्दाफाश! इमामवाड्यात तिघे जेरबंद; अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

नागपूर शहरात अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान पोलिसांनी आणखी एक मोठी कारवाई करत एमडी पावडरच्या अवैध व्यवहाराचा पर्दाफाश केला आहे. गुन्हेशाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापळा रचून तीन आरोपींना रंगेहाथ ताब्यात घेतले असून त्यांच्या ताब्यातून एमडी पावडरसह मोबाईल फोन आणि दुचाकी असा एकूण २ लाख ५० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणातील आणखी एक आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

नागपूर पोलीस आयुक्तालयाच्या ‘ऑपरेशन थंडर’ मोहिमेंतर्गत शहरात अंमली पदार्थांविरोधातील कारवाया अधिक तीव्र करण्यात आल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ११ जून रोजी सायंकाळच्या सुमारास गुन्हेशाखेचे अंमली पदार्थ विरोधी पथक इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिरसपेठ परिसरात गस्त घालत होते.

यावेळी तीन संशयित युवक पोलिसांच्या हालचाली पाहून संशयास्पदरीत्या वागत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली आणि झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातील झिपलॉक पिशवीमध्ये १३ ग्रॅम एमडी पावडर आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने तिन्ही आरोपींना अटक केली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये आरीफ खान पठाण, प्रांजल गजभिये आणि कुणाल जिभकाटे यांचा समावेश आहे. कारवाईदरम्यान आरोपींकडून एमडी पावडर, मोबाईल फोन आणि पल्सर मोटारसायकल जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत २ लाख ५० हजार ५०० रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिस तपासात मुख्य आरोपी आरीफ खान पठाण याने ही एमडी पावडर शाहबाज पठाण उर्फ अमू याच्याकडून आणल्याची कबुली दिली. तर प्रांजल गजभिये आणि कुणाल जिभकाटे हे एमडी पावडर खरेदी करण्यासाठी तेथे आले असल्याचे तपासात समोर आले आहे. आर्थिक फायद्यासाठी अंमली पदार्थांची खरेदी-विक्री सुरू असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.

दरम्यान, या प्रकरणातील मुख्य पुरवठादार मानला जाणारा शाहबाज पठाण उर्फ अमू हा फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके रवाना केली आहेत. त्याच्या अटकेनंतर या रॅकेटमधील आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ऑपरेशन थंडर अंतर्गत नागपूर पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे शहरातील अंमली पदार्थांच्या अवैध व्यवहाराला मोठा धक्का बसला आहे. मात्र या कारवाईमुळे एमडी पावडरचे जाळे शहरात किती खोलवर पसरले आहे, याचाही उलगडा झाला आहे. आता फरार आरोपीच्या अटकेनंतर या संपूर्ण रॅकेटमागील साखळी उघड होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button