citynewsLatest NewsMaharashtraMaharashtra PoliticsMumbaipolitics

१ ऑगस्टपासून महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड बंधनकारक; एसटी प्रवासात मोठा बदल

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी आणि प्रवास व्यवस्थापन अधिक पारदर्शक व सुलभ करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १ ऑगस्ट २०२६ पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी एनसीएमसी (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर स्मार्ट कार्ड नोंदणी आणि वितरण मोहिमेला वेग देण्यात आला आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आजपर्यंत सुमारे ५१ लाख नागरिकांनी एनसीएमसी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली असून त्यापैकी जवळपास २५ लाख कार्ड कार्यान्वित करण्यात आली आहेत. उर्वरित लाभार्थ्यांची कार्डेही लवकरच सुरू करण्यात येणार असल्याने नागरिकांनी विलंब न करता प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी राज्यभरात ४ हजारांहून अधिक स्मार्ट कार्ड वितरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना सहजपणे कार्ड उपलब्ध व्हावे यासाठी ही केंद्रे सक्रियपणे सेवा देत आहेत. शासनाच्या विविध प्रवासी सवलतींचा लाभ घेण्यासाठी संबंधित लाभार्थ्यांना हे कार्ड आवश्यक असणार आहे.

दरम्यान, स्मार्ट कार्ड वितरण प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार सहन केला जाणार नसल्याचा इशाराही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. विहित शुल्कापेक्षा जास्त रक्कम आकारून कार्ड वितरित करणाऱ्या केंद्रांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून अशा केंद्रांचा परवाना तात्काळ रद्द केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या विविध प्रवासी सवलतींचे व्यवस्थापन अधिक पारदर्शक आणि प्रभावी करण्यासाठी ही स्मार्ट कार्ड प्रणाली राबविण्यात येत आहे. यामुळे तिकीट वितरण प्रक्रिया सुलभ होण्यासोबतच डिजिटल व्यवहारांनाही प्रोत्साहन मिळणार आहे.

१ ऑगस्टची अंतिम मुदत लक्षात घेता संबंधित लाभार्थ्यांनी आपले एनसीएमसी स्मार्ट कार्ड लवकरात लवकर प्राप्त करून ते कार्यान्वित करून घ्यावे, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे. राज्यातील लाखो महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या एसटी प्रवासात या निर्णयामुळे मोठा बदल होणार असल्याचे मानले जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button