“शस्त्रक्रियेपलीकडची समाजसेवा! अमरावतीत सर्जन्सकडून मोफत शस्त्रक्रिया, रक्तदान आणि जनजागृतीचा भव्य समाज कल्याण सप्ताह”

अमरावती : शल्यचिकित्सक म्हटलं की रुग्णांवरील उपचार आणि ऑपरेशन थिएटर हेच चित्र डोळ्यासमोर उभे राहते. मात्र अमरावतीतील सर्जन्सनी वैद्यकीय सेवेपलीकडे जाऊन समाजसेवेचा आदर्श निर्माण केला आहे. असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडियाच्या मार्गदर्शनाखाली ५ ते १४ जून या कालावधीत अमरावती जिल्ह्यात भव्य समाज कल्याण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून या माध्यमातून गरजू रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया, आरोग्य जनजागृती आणि विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू रुग्णांना दिलासा देण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील शल्यचिकित्सक एकत्र आले आहेत. धनवंतरी सहकारी हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. ओ. जी. मुंढडा यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत असून त्यासाठी डॉ. मुरलीधर बूब, डॉ. कौस्तुभ सारडा, डॉ. जयश्री इंगोले आणि डॉ. राजेंद्र गनेरीवाल यांनी विशेष पुढाकार घेतला आहे.
दहा दिवस चालणाऱ्या या समाज कल्याण सप्ताहात केवळ मोफत शस्त्रक्रियाच नव्हे तर समाजोपयोगी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये वृक्षारोपण, सीपीआर आणि इमर्जन्सी लाईफ सपोर्ट प्रशिक्षण, नर्सेस प्रशिक्षण, वॉकाथॉन, स्तन कर्करोग जनजागृती अभियान, आशा वर्कर प्रशिक्षण, अन्नदान कार्यक्रम तसेच रक्तदान शिबिरांचा समावेश आहे.
हे उपक्रम अमरावतीसह परतवाडा, कारंजा लाड, मंगरुळपीर आणि आसेगाव पूर्णा या भागांमध्ये राबविण्यात येणार आहेत. विशेषतः स्तन कर्करोग जनजागृती मोहिमेद्वारे महिलांना रोगाची लक्षणे, वेळेवर निदान आणि उपचारांचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
याशिवाय होमगार्ड जवानांना सीपीआर आणि आपत्कालीन जीवनरक्षक तंत्राचे प्रशिक्षण देण्यात येणार असून विविध रुग्णालयांमधील नर्सेस आणि वॉर्ड बॉय यांच्यासाठीही विशेष प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे आपत्कालीन परिस्थितीत अधिक प्रभावी आणि तत्पर आरोग्य सेवा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
समाज कल्याण सप्ताहाच्या निमित्ताने जिल्ह्यातील ज्येष्ठ आणि नामवंत शल्यचिकित्सकांचा गौरव सोहळाही आयोजित करण्यात आला आहे. आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या डॉक्टरांचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे.
डॉक्टरांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी विशेष योग शिबिराचेही आयोजन करण्यात आले असून योगतज्ज्ञांकडून मार्गदर्शन दिले जाणार आहे.
आरोग्य सेवा आणि समाजसेवा यांचा सुंदर संगम घडवणारा हा समाज कल्याण सप्ताह अमरावती जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहे. मोफत शस्त्रक्रिया, रक्तदान, जनजागृती आणि प्रशिक्षण उपक्रमांच्या माध्यमातून सर्जन्सनी समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. या उपक्रमांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.



