AmravaticitynewsCrime NewsLatest NewsMaharashtra

अमरावतीत चोरट्यांचा धुमाकूळ! दीड तास घरात ठाण मांडून लाखोंचा ऐवज लंपास; संपूर्ण प्रकार CCTV मध्ये कैद

अमरावती : शहरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंगलधाम कॉलनीमध्ये चोरट्यांनी धाडसी चोरी करत तब्बल दीड तास घरात ठाण मांडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगलधाम कॉलनीतील महेंद्र टूंडल्यात यांच्या बांधकामाधीन घराला चोरट्यांनी लक्ष्य केले. सीसीटीव्ही फुटेजनुसार, रात्री साधारण दीड वाजून तीस मिनिटांच्या सुमारास तीन चोरटे घरात शिरले. घरात कोणीही नसल्याची खात्री करून त्यांनी संपूर्ण घराची कसून झडती घेतली.

धक्कादायक बाब म्हणजे हे चोरटे तब्बल दीड तास घरामध्ये वावरत होते. यावेळी त्यांनी घरात बसविण्यात आलेल्या इलेक्ट्रिक वायर, स्विच बॉक्स तसेच इतर बांधकाम साहित्य काढून घेतले. चोरी केलेले साहित्य तीन मोठ्या बोर्‍यांमध्ये भरून त्यांनी घटनास्थळावरून पलायन केले. चोरी झालेल्या साहित्याची किंमत सुमारे 80 हजार रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

मात्र चोरट्यांचा धुमाकूळ एवढ्यावरच थांबला नाही. याच परिसरातील डॉ. अनुज घोडे यांच्या क्लिनिकलाही त्यांनी लक्ष्य केले. क्लिनिकमधून लॅपटॉपसह इतर मौल्यवान साहित्य चोरी करून चोरट्यांनी पोबारा केला. या चोरीमुळे सुमारे 50 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

संपूर्ण चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये स्पष्टपणे कैद झाली असून त्यामध्ये तीनही संशयित चोरटे दिसून येत आहेत. घटनेची माहिती मिळताच फ्रेजरपुरा पोलीस, डॉग स्कॉड आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे.

दरम्यान, शहरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रात्रीच्या वेळी चोरटे इतक्या बिनधास्तपणे चोरी करून पसार होत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण आहे.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवून त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button