citynewsLatest NewsMaharashtraMaharashtra PoliticsMumbaipolitics

राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी प्रथमच ऑनलाइन तिकीट व्यवस्था; ‘तिकीटालय’ ॲपवरून नाटकांची तिकिटे उपलब्ध – मंत्री ॲड. आशिष शेलार

मुंबई : सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 36 व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी 8 जून ते 18 जून 2026 या कालावधीत मुंबईतील छत्रपती शिवाजी नाट्य मंदिर येथे रंगणार आहे. या स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच रसिक प्रेक्षकांसाठी ऑनलाइन तिकीट व्यवस्थेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून ‘तिकीटालय’ ॲपद्वारे नाट्यप्रयोगांची तिकिटे विक्रीसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिली.

राज्यातील उत्कृष्ट आणि दर्जेदार व्यावसायिक नाट्यप्रयोगांची मेजवानी या अंतिम फेरीत रसिकांना अनुभवता येणार आहे. विविध नामांकित नाट्यसंस्था, निर्माते आणि कलाकारांच्या सहभागामुळे यंदाची स्पर्धा विशेष आकर्षण ठरणार आहे. मराठी रंगभूमीवरील विविध विषय, सामाजिक वास्तव, कौटुंबिक नातेसंबंध, विनोदी कथानक आणि समकालीन घडामोडींवर आधारित नाट्यकृती या स्पर्धेत सादर होणार आहेत.

स्पर्धेची सुरुवात 8 जून रोजी ‘ठरलंय FOREVER’ या नाटकाने होणार आहे. त्यानंतर ‘सविता दामोदर परांजपे’, ‘भूमिका’, ‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय!’, ‘कुटुंब किरैतन’, ‘एकदा असंच पाहावं करून’, ‘करुणाष्टके – उंबरठ्या पलीकडची गोष्ट’, ‘मीमी’ आणि ‘शंकर जयकिशन’ या नाट्यकृतींचे प्रयोग सादर करण्यात येणार आहेत. या सर्व नाटकांमधून प्रेक्षकांना विविध भावविश्वांचा अनुभव घेता येणार असून मराठी रंगभूमीची समृद्ध परंपरा नव्या स्वरूपात पाहायला मिळणार आहे.

मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून आणि सांस्कृतिक कार्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. राज्यातील व्यावसायिक रंगभूमीला चालना देणे, गुणवत्तापूर्ण नाट्यनिर्मितींना प्रोत्साहन देणे, नव्या संकल्पनांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि नाट्यकलेचा दर्जा अधिक उंचावणे हा या स्पर्धेमागील प्रमुख उद्देश असल्याचे सांगण्यात आले.

रसिक प्रेक्षकांना अधिक सुलभ पद्धतीने तिकीट उपलब्ध व्हावीत यासाठी यंदा प्रथमच डिजिटल तिकीट प्रणाली लागू करण्यात आली आहे. स्पर्धेतील सर्व नाट्यप्रयोगांसाठी 50 रुपये आणि 30 रुपये असे तिकीट दर निश्चित करण्यात आले आहेत. प्रत्येक प्रयोगाच्या दोन दिवस आधी सकाळी 10 वाजल्यापासून ‘तिकीटालय’ ॲपवर तिकीट विक्री सुरू होणार आहे.

राज्यभरातील नाट्यप्रेमींनी या संधीचा लाभ घेऊन दर्जेदार मराठी नाटकांचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे. मराठी रंगभूमीच्या समृद्ध परंपरेचा उत्सव असलेल्या या स्पर्धेकडे राज्यातील नाट्यरसिकांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button