citynewsLatest NewsMaharashtraMumbai

FDA मध्ये तुकाराम मुंढेंचा धडाका; ७२ तासांत ५३ ठिकाणी छापे, भेसळखोर आणि गुटखा माफियांमध्ये खळबळ

मुंबई, प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या प्रशासनात पुन्हा एकदा कडक शिस्तप्रिय आणि धडाडीचे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची चर्चा रंगू लागली आहे. अन्न आणि औषध प्रशासन (FDA) आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अवघ्या ७२ तासांत त्यांनी राज्यभर धडक कारवायांची मालिका राबवत भेसळखोर आणि गुटखा माफियांविरोधात मोठी मोहीम उघडली आहे.

२५ मे २०२६ रोजी तुकाराम मुंढे यांनी FDA आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. आपल्या कठोर आणि पारदर्शक कार्यपद्धतीसाठी ओळखल्या जाणाऱ्या मुंढे यांची २१ वर्षांच्या सेवाकाळात तब्बल २५ वेळा बदली झाली आहे. पदभार स्वीकारताच त्यांनी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन राज्यातील सर्व अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले.

“जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही,” असा स्पष्ट इशारा देत त्यांनी राज्यव्यापी विशेष तपास मोहीम सुरू करण्याचे आदेश दिले.

या आदेशानंतर मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, कोकण आणि छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील विविध भागांमध्ये एकाच वेळी ५३ ठिकाणी धाडसत्र राबविण्यात आले. या कारवाईदरम्यान ३३ जणांना अटक करण्यात आली असून २५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच २७ बेकायदेशीर आस्थापने सील करण्यात आली असून पाच वाहने जप्त करण्यात आली आहेत. २० लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल प्रशासनाने ताब्यात घेतला आहे.

गुटख्यासह दूध, पाणी, मिठाई, तेल, पनीर, खवा आणि इतर खाद्यपदार्थांमधील भेसळीविरोधातही मोठी कारवाई करण्यात आली. त्यामुळे राज्यभरातील भेसळखोरांमध्ये खळबळ उडाली आहे.

विशेष बाब म्हणजे नागरिकांना आता थेट FDA च्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तक्रारी नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे जनतेचा सहभाग वाढून अन्न भेसळविरोधातील लढा अधिक प्रभावी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

तुकाराम मुंढे यांनी पुन्हा एकदा पदापेक्षा जनहिताला प्राधान्य देणारी कार्यशैली दाखवून दिली आहे. FDA मधील त्यांच्या धडक कारवाईमुळे संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेला उधाण आले असून येत्या काळात भेसळखोर आणि बेकायदेशीर व्यावसायिकांविरोधातील मोहिम आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button