दत्तापूर येथे तक्रार निवारण दिन; ग्रामीण पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांची नागरिकांशी थेट संवाद साधत तक्रारींची दखल

दत्तापूर पोलीस ठाण्यात आयोजित तक्रार निवारण दिनामध्ये ग्रामीण पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी नागरिकांच्या तक्रारी प्रत्यक्ष ऐकून घेतल्या. या वेळी त्यांनी विविध समस्यांवर तातडीने कार्यवाहीचे निर्देश देत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले.
कार्यक्रमादरम्यान अधीक्षक कदम यांनी पोलीस ठाण्याची पाहणी करत अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी आवश्यक सूचना व मार्गदर्शनही त्यांनी केले.
तक्रार निवारण दिनात विविध भागांतून आलेल्या नागरिकांनी आपल्या अडचणी मांडल्या. या सर्व तक्रारी संयमाने ऐकून संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने निराकरण करण्याचे आदेश देण्यात आले. काही प्रकरणांमध्ये संबंधितांना पोलीस ठाण्यात बोलावून कायद्याचे पालन करण्याबाबत समुपदेशनही करण्यात आले.
या उपक्रमामुळे नागरिकांना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमोर थेट आपली मते आणि समस्या मांडण्याची संधी मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाला शांतता समिती सदस्य, पोलीस पाटील संघटनेचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, प्रतिष्ठित नागरिक आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांशी संवाद साधताना निकेतन कदम यांनी पोलीस प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले.
शहर आणि परिसरातील अवैध धंद्यांवर कठोर कारवाई सुरूच राहील, तसेच महिला व मुलींच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी 112 हेल्पलाईनचा वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले.



