मिरा-भाईंदर काशिमिरा ब्रीजवर भीषण अपघात; टायर फुटल्याने कार कंटेनरवर आदळली, १९ वर्षीय युवक ठार

मिरा-भाईंदर येथील काशिमिरा ब्रीजवर झालेल्या भीषण अपघातात १९ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे काही काळ परिसरात एकच खळबळ उडाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, फाउंटन परिसरातून ठाण्याच्या दिशेने जाणारी ब्रिझा कार काशिमिरा ब्रीजवरून जात असताना अचानक कारचा टायर फुटला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार समोरून मुंबईहून गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरवर जोरदार आदळली.
धडक इतकी भीषण होती की कारचा समोरील भाग पूर्णपणे चकनाचूर झाला. या अपघातात कारमधील १९ वर्षीय युवकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तर कारमधील अन्य चार जण जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि बचाव पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, मृत युवकाचा मृतदेह सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
टायर फुटल्यामुळे झालेल्या या भीषण अपघातामुळे वाहनांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत असून वाहनचालकांनी प्रवासापूर्वी वाहनांची तपासणी करणे किती महत्त्वाचे आहे हे अधोरेखित झाले आहे.



