नागपुरातील नंदनवनमध्ये युवकाची दगडाने ठेचून हत्या; दोन आरोपींवर गुन्हा दाखल

नागपुरातील नंदनवन परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ वादातून एका युवकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गल्ली क्रमांक एकमध्ये ही घटना घडली. मृत युवकाची ओळख संजय उर्फ दुर्गा शंकर ठाकुर अशी झाली आहे.
दुपारच्या सुमारास मृतक संजय आणि आरोपी आयुष तसेच अभिषेक यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला होता. या वादाचा राग मनात धरून आरोपींनी संध्याकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास संजयला गल्ली क्रमांक एकमध्ये अडवले.
यानंतर जुन्या वादातून त्याच्यावर मोठ्या दगडाने हल्ला करण्यात आल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात गंभीर दुखापत झाल्याने संजय याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच नंदनवन पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
या प्रकरणात पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
किरकोळ वादातून घडलेल्या या हत्येमुळे परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणात पुढे आणखी कोणती माहिती समोर येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा सिटी न्यूज.



