AmravatiLatest Newspolitics

सात तासांनंतर बडनेरा नवि वस्तीचा वीजपुरवठा सुरळीत, उकाड्याने त्रस्त नागरिकांना अखेर दिलासा

बडनेरा नवि वस्ती परिसरात आज पहाटे अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना तीव्र उकाड्याचा सामना करावा लागला. मात्र तब्बल सात तासांच्या अथक प्रयत्नांनंतर महावितरणच्या अभियंते आणि कर्मचाऱ्यांनी वीजपुरवठा पुन्हा सुरळीत करण्यात यश मिळवले आहे.

शनिवारी पहाटे साधारण पाच वाजताच्या सुमारास बडनेरा नवि वस्ती परिसरातील वीजपुरवठा अचानक खंडित झाला. कोंडेश्वर मार्गावरील तेहतीस केव्ही केंद्रावरून येणाऱ्या भूमिगत वीजवाहिनीत तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने संपूर्ण परिसर अंधारात गेला होता. वीजपुरवठा खंडित झाल्याने सकाळपासूनच नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागला. घरातील विद्युत उपकरणे बंद पडल्याने नागरिक त्रस्त झाले होते. तसेच अनेक छोटे व्यवसाय देखील बंद पडल्याने व्यापाऱ्यांना आर्थिक फटका बसला. घटनेची माहिती मिळताच महावितरणचे अभियंते आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. प्रखर उन्हात आणि कठीण परिस्थितीत त्यांनी सातत्याने काम सुरू ठेवले. भूमिगत केबलमधील तांत्रिक दोष शोधून काढत दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर करण्यात आले.
जवळपास सात तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास वीजपुरवठा पुन्हा सुरळीत करण्यात आला. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला. महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या मेहनतीमुळेच तांत्रिक बिघाड दूर करण्यात यश आल्याची माहिती सहायक अभियंता जाधव यांनी दिली आहे.

बडनेरा नवि वस्ती परिसरातील नागरिकांना तब्बल सात तास वीज खंडित झाल्याने त्रास सहन करावा लागला असला तरी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी कठीण परिस्थितीत केलेल्या कामाचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button