अमरावती भूमी अभिलेख कार्यालयाला अप्पर मुख्य सचिवांची भेट, पंधरा दिवसांत मोजणी पूर्ण करण्यावर भर सर्व तालुक्यांना रोवर आणि लॅपटॉपचे वितरण

महाराष्ट्र राज्याचे अप्पर मुख्य सचिव महसूल विभाग श्री विकासजी खारगे यांनी अमरावती जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाला भेट देत विविध विभागांच्या कामकाजाचा सखोल आढावा घेतला. यावेळी अत्याधुनिक मोजणी यंत्र रोवर तसेच ई ऑफिस प्रणालीची माहिती घेण्यात आली.
दिनांक बावीस मे दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्र राज्याचे अप्पर मुख्य सचिव महसूल विभाग श्री विकासजी खारगे यांनी अमरावती येथील जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाला भेट दिली. आगमन होताच त्यांनी विविध संकलनांना भेट देत प्रत्यक्ष कामकाजाचा आढावा घेतला.
सुरुवातीला डाक वितरण तसेच अत्याधुनिक ई ऑफिस प्रणालीविषयी माहिती घेण्यात आली. त्यानंतर अपील संकलनासह भूमापन नगर भूमापन आणि एकत्रीकरण या भूमी अभिलेख विभागाच्या महत्त्वाच्या कामकाजाची सविस्तर माहिती माननीय अप्पर मुख्य सचिवांना देण्यात आली.
यावेळी उपसंचालक भूमी अभिलेख श्री सुदामजी जाधव तसेच जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख श्री महेशकुमार शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध कामकाजाची माहिती पीपीटी सादरीकरणाद्वारे देण्यात आली. भेटीदरम्यान अप्पर मुख्य सचिवांनी अत्याधुनिक मोजणी यंत्र रोवर विषयी विशेष माहिती जाणून घेतली. मोजणी प्रक्रिया सुरू होण्यापासून ते मोजणी नकाशाची प्रत वितरणापर्यंतचा संपूर्ण प्रवास त्यांनी समजून घेतला.
यावेळी जिल्हाधिकारी अमरावती श्री आशिष येरेकर यांच्या आदेशानुसार भूसंपादन प्रक्रियेतील तीन टक्के सेवाशुल्क निधीतून सर्व तालुका कार्यालयांना रोवर आणि लॅपटॉपचे वितरण करण्यात आले. मार्गदर्शन करताना महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पंधरा दिवसांत मोजणी प्रक्रिया पूर्ण करण्याच्या धोरणावर विशेष भर देण्यात आला. तसेच जमाबंदी आयुक्त आणि संचालक श्री शैलेश कुमार नवाल यांच्या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी करून भूमी अभिलेख विभागाचे कामकाज अधिक वेगवान आणि गुणात्मक करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.
अमरावती भूमी अभिलेख विभागाच्या या आढावा बैठकीमुळे भविष्यात मोजणी प्रक्रिया अधिक वेगवान आणि पारदर्शक होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



