नागपुरात कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या १२ गोवंशांची सुटका; पाचपावली पोलिसांची मोठी कारवाई

नागपूर शहरात गोवंशांवर होणाऱ्या अमानुष अत्याचाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पाचपावली पोलिसांनी केलेल्या मोठ्या कारवाईत तब्बल १२ गोवंश जनावरांची सुटका करण्यात आली असून कत्तलीसाठी त्यांना निर्दयपणे डांबून ठेवल्याचा आरोप आहे. या कारवाईत दोन लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नागपूरच्या पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना उघडकीस आली. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे संबंधित ठिकाणी छापा टाकण्यात आला. यावेळी आरोपीच्या ताब्यातील गोठा आणि घरासमोरील अवघ्या दहा बाय दहा फुटांच्या खोलीत एकूण १२ गोवंश जनावरे कोंबून ठेवण्यात आल्याचे आढळून आले.
पोलिसांच्या माहितीनुसार, या जनावरांना हलताही येणार नाही अशा अवस्थेत नायलॉनच्या दोऱ्यांनी नाकातून आणि तोंडातून बांधण्यात आले होते. एवढेच नाही तर त्यांना अन्न आणि पाण्याविना ठेवण्यात आल्याने प्राण्यांवरील क्रूरतेचे गंभीर स्वरूप समोर आले.
पोलिसांनी चौकशी केली असता ही जनावरे अवैध कत्तलीच्या उद्देशाने आणल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आरोपींना ताब्यात घेण्यात आले आणि वैद्यकीय तपासणीसाठी मेयो रुग्णालयात नेल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करत अटक करण्यात आली.
या कारवाईत चार पांढऱ्या गायी, दोन काळ्या गायी, दोन पांढऱ्या-काळ्या गायी, दोन लाल रंगाच्या छोट्या गायी तसेच दोन वासरांसह एकूण १२ गोवंश जनावरे आणि नायलॉन दोऱ्या जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची अंदाजे किंमत २ लाख ४०० रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९९५ तसेच प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करणाऱ्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंगल, सह पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अप्पर पोलीस आयुक्त राजेंद्र दाभाडे, पोलीस उपायुक्त राहुल मदने आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शिवप्रसाद पारखे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिरुद्ध पुरी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही यशस्वी कारवाई पार पाडली असून पुढील तपास सुरू आहे.
गोवंशांची अवैध वाहतूक आणि कत्तलीसाठी केले जाणारे अमानुष प्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे या कारवाईतून दिसून आले आहे. या प्रकरणातील तपास सुरू असून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



