citynewsCrime NewsLatest NewsMaharashtraNagpurNagpur gramin

नागपूरमध्ये चारित्र्याच्या संशयातून पत्नीवर जीवघेणा हल्ला; बेलतरोडी पोलिसांच्या तत्परतेमुळे महिलेचे प्राण वाचले

नागपूरमध्ये एका धक्कादायक कौटुंबिक वादाचे रूपांतर थेट जीवघेण्या हल्ल्यात झाले. चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर चाकूने प्राणघातक हल्ला करणाऱ्या पतीला बेलतरोडी पोलिसांनी अवघ्या काही मिनिटांत अटक केली. विशेष म्हणजे पोलिसांच्या तत्परतेमुळे गंभीर जखमी महिलेचे प्राण वाचले असून या धाडसी कामगिरीबद्दल पोलीस आयुक्तांनी संबंधित कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान केला आहे.

नागपूर पोलीस आयुक्तालयाच्या बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोपाळपायरी गावात ही खळबळजनक घटना घडली. काल मध्यरात्रीच्या सुमारास घरफोडी आणि चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी बेलतरोडी पोलिसांची विशेष नाईट गस्त सुरू होती. दोन पोलीस अधिकारी आणि 35 पोलीस अंमलदार चार वाहनांमधून संपूर्ण परिसरात गस्त घालत होते.

याचवेळी एका नागरिकाने धावत येऊन गस्तीवरील पोलिसांना माहिती दिली की त्याचा मुलगा आपल्या पत्नीला घरात जीवे मारण्याचा प्रयत्न करत आहे. माहिती मिळताच पीएसआय नारायण घोडके आणि पोलीस शिपाई रितेश गोडमारे यांनी क्षणाचाही विलंब न करता थेट घटनास्थळ गाठले.

घरात पोहोचताच पोलिसांना धक्कादायक दृश्य पाहायला मिळाले. आरोपी ऋषिकेश सुरेंद्र वानखडे हा त्याची पत्नी अश्लेषा वानखडे हिच्यावर चाकूने हल्ला करत होता. आरोपीने पत्नीच्या गळ्यावर आणि डोक्यावर गंभीर वार केले होते.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अश्लेषा यांना पोलिसांनी तात्काळ शासकीय वाहनातून हेम्स रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केल्याने तिचे प्राण वाचवण्यात यश आले.

पोलिसांच्या माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये चारित्र्याच्या संशयावरून सातत्याने वाद सुरू होते. आरोपी ऋषिकेश वानखडे हा ओला कंपनीत चालक म्हणून काम करत असून पोलिसांना चकवा देण्यासाठी तो वारंवार आपला पत्ता बदलत असल्याची माहितीही समोर आली आहे. मात्र या वेळी पोलिसांनी त्याला घटनास्थळावरूनच ताब्यात घेत अटक केली.

या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास बेलतरोडी पोलीस करत आहेत. पोलिसांनी दाखवलेल्या धाडस आणि तत्परतेमुळे एका महिलेचा जीव वाचला असून या उल्लेखनीय कामगिरीबद्दल नागपूरचे पोलीस आयुक्त, सहपोलीस आयुक्त तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पीएसआय नारायण घोडके आणि पोलीस शिपाई रितेश गोडमारे यांचा विशेष सत्कार केला आहे.

वेळेवर मिळालेली माहिती, पोलिसांची जलद हालचाल आणि जीवाची पर्वा न करता केलेली कारवाई यामुळे एका महिलेचा जीव वाचला. नागपूर पोलिसांच्या या धाडसी आणि तत्पर कारवाईचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button