अकोल्यात अवैध गुटखा निर्मिती कारखान्यावर धाड; १.२३ कोटींचा मुद्देमाल जप्त

एमआयडीसी परिसरातील कारवाईत हजारो गुटखा पॅकेट, टनावारी कच्चा माल आणि अत्याधुनिक यंत्रसामग्री हस्तगत; मुख्य आरोपी फरार
अकोला | प्रतिनिधी
महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याच्या अवैध उत्पादनाविरोधात अन्न व औषध प्रशासनाने अकोल्यात मोठी कारवाई केली आहे. अकोला एमआयडीसी फेज-४ परिसरातील एका कारखान्यावर टाकलेल्या धाडीत १ कोटी २३ लाख १४ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत हजारो गुटखा पॅकेट, मोठ्या प्रमाणातील कच्चा माल तसेच गुटखा निर्मितीसाठी वापरण्यात येणारी अत्याधुनिक यंत्रसामग्री हस्तगत करण्यात आली आहे.
खाद्य व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त देवानंद वीर यांच्या नेतृत्वाखाली अकोला, अमरावती आणि वाशिम येथील अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एमआयडीसी फेज-४ येथील महाकाया ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडच्या जागेवर सुरू असलेल्या कथित अवैध गुटखा निर्मिती कारखान्यावर छापा टाकला.
तपासादरम्यान ‘विमल’, ‘वाह’, ‘रेड लेबल’ आणि ‘बहार’ या नावांनी प्रतिबंधित पान मसाला आणि सुगंधित तंबाखूचे उत्पादन व पॅकिंग सुरू असल्याचे आढळून आले. पथकाने हजारो तयार गुटखा पॅकेट, मोठ्या प्रमाणातील सुगंधित तंबाखू, सुमारे २,५०० किलो सुपारी, १,५०० किलो गुटखा प्रीमिक्स, ३८० किलो तंबाखू, ५० किलो कत्था पावडर आणि ३०० किलो मॅग्नेशियम कार्बोनेट जप्त केले. याशिवाय पॅकिंग रोल, रिकामे पाऊच आणि इतर कच्चा मालही हस्तगत करण्यात आला.
कारवाईदरम्यान गुटखा निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या चार पाऊच पॅकिंग मशीन, दोन ब्लेंडिंग मशीन, दोन ग्राइंडिंग मशीन, स्क्रीनिंग मशीन आणि सीलिंग मशीन प्रशासनाने ताब्यात घेतल्या.
या कारखान्यात काम करणाऱ्या तीन कामगारांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यापैकी एक जण अल्पवयीन असल्याची शक्यता तपासली जात आहे. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी गौरव अशोक शर्मा हा कारवाईपूर्वीच फरार झाल्याची माहिती समोर आली असून, त्याचा शोध सुरू आहे.
या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, अवैध गुटखा निर्मितीमागील संपूर्ण पुरवठा साखळी, वितरण व्यवस्था आणि संबंधित व्यक्तींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.
खाद्य सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या निर्देशानुसार राज्यभर सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्रात गुटख्यावर बंदी असतानाही मोठ्या प्रमाणात अवैध उत्पादन सुरू असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले असून, या रॅकेटमागील इतर संबंधितांचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणा कामाला लागल्या आहेत.



