citynewsLatest NewsMaharashtraNagpurNagpurCrimeNagpurPolice

गिट्टीखदान पोलिसांची तातडीची कारवाई; चोरीचा ऑटो अवघ्या चार तासांत जप्त

सराईत वाहनचोराला अटक; ७० हजार रुपयांचा ऑटो हस्तगत

नागपूर | प्रतिनिधी

नागपूर शहरातील गिट्टीखदान परिसरातून चोरीला गेलेला ऑटो अवघ्या चार तासांत शोधून काढत गिट्टीखदान पोलिसांनी सराईत वाहनचोराला अटक केली आहे. तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई करत चोरीचा सुमारे ७० हजार रुपये किमतीचा ऑटो जप्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गिट्टीखदान परिसरातील गोरेवाडा रोडवरील भारत पेट्रोल पंपासमोर पार्क केलेला ऑटो अज्ञात चोरट्याने लंपास केला होता. घटनेनंतर ऑटो मालकाने गिट्टीखदान पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तक्रार मिळताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयिताचा माग काढण्यात आला. त्यानंतर सापळा रचून निलेश राजेंद्र सोनवाणे (वय २६) याला ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांच्या चौकशीदरम्यान आरोपीने ऑटो चोरीची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून चोरीला गेलेला सुमारे ७० हजार रुपये किमतीचा ऑटो जप्त करण्यात आला असून तो मूळ मालकाच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

तपासादरम्यान आरोपी हा यापूर्वीही वाहन चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेला सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे त्याच्याकडून इतर वाहन चोरीच्या गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

गिट्टीखदान पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे चोरीचा ऑटो अवघ्या चार तासांत हस्तगत करण्यात यश आले असून, या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button