मोर्शी-चांदूरबाजार मार्गावर जळालेल्या ट्रकमध्ये अर्धवट जळालेला मृतदेह

घातपाताचा प्राथमिक संशय; मृताची ओळख पटविण्यासाठी आणि घटनेचे गूढ उलगडण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू
अमरावती | प्रतिनिधी
अमरावती जिल्ह्यातील मोर्शी-चांदूरबाजार मार्गावर जळालेल्या ट्रकमध्ये अर्धवट जळालेल्या अवस्थेत एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे अपघात, आत्महत्या की घातपात, याबाबत विविध तर्कवितर्कांना उधाण आले असून पोलिसांनी सर्व शक्यता गृहीत धरून तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री मोर्शी ते चांदूरबाजार मार्गावर एमएच-२९ टी-२९०३ क्रमांकाचा ट्रक जळालेल्या अवस्थेत उभा असल्याची माहिती मोर्शी पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिस आणि अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर ट्रकच्या केबिनची पाहणी केली असता, आत अर्धवट जळालेल्या अवस्थेत एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला.
पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित ट्रक चंद्रपूर जिल्ह्यातील असून ट्रकचा मालक म्हाडा कॉलनी परिसरात राहत असल्याचे समोर आले आहे. मात्र, मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून त्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.
घटनास्थळावरील परिस्थिती पाहता या प्रकरणात घातपाताचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात येत आहे. ट्रकला आग नेमकी कशी लागली, मृत व्यक्तीचा मृत्यू आगीपूर्वी झाला की आगीत होरपळून झाला, तसेच या घटनेमागे अन्य कोणते कारण आहे का, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.
दरम्यान, घटनास्थळाचा पंचनामा करून आवश्यक पुरावे संकलित करण्यात आले असून फॉरेन्सिक तपासाच्या मदतीने घटनेचे गूढ उलगडण्याचा प्रयत्न सुरू आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता असून, या रहस्यमय घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि चर्चेचे वातावरण निर्माण झाले आहे.



