माहूर तालुक्यात महिलांचा दारूबंदीसाठी एल्गार; ग्रामसभेत शंभर टक्के दारूबंदीचा ठराव मंजूर

वझरा व अजनी गावातील हजारो महिलांची एकजूट; दारूमुळे वाढणाऱ्या सामाजिक समस्यांविरोधात कठोर भूमिका
नांदेड | प्रतिनिधी
नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यात दारूबंदीच्या मागणीसाठी महिलांनी मोठा एल्गार पुकारला आहे. धार्मिक आणि पर्यटनस्थळ म्हणून ओळख असलेल्या शेख फरीद वझरा आणि अजनी गावातील हजारो महिला एकत्र येत ग्रामसभेत शंभर टक्के दारूबंदीचा ठराव मंजूर करण्यात आला. दारूमुळे वाढणारे कौटुंबिक वाद, मारामाऱ्या, चोरीच्या घटना आणि सामाजिक समस्यांविरोधात महिलांनी घेतलेल्या या भूमिकेची संपूर्ण परिसरात चर्चा सुरू आहे.
माहूर तालुक्यातील मौजे शेख फरीद वझरा हे गाव धार्मिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जाते. मात्र, गावात सुरू असलेले बिअर बार, बिअर शॉपी तसेच अवैध दारू विक्रीमुळे सामाजिक वातावरण बिघडत असल्याचा आरोप ग्रामस्थ महिलांनी केला आहे.
महिलांच्या म्हणण्यानुसार, दारूच्या वाढत्या व्यसनामुळे घरगुती कलह, मारामाऱ्या, चोरीच्या घटना आणि कुटुंबांचे आर्थिक नुकसान वाढत आहे. त्यामुळे वझरा आणि अजनी गावातील महिलांनी मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहीम राबवत ग्रामस्थांना दारूबंदीची गरज पटवून दिली.
यानंतर आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसभेत हजारो महिलांच्या उपस्थितीत गावात शंभर टक्के दारूबंदी लागू करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. यावेळी गावातील सर्व परवानाधारक तसेच अवैध दारू विक्री केंद्रे तातडीने बंद करण्याची जोरदार मागणी करण्यात आली.
सरपंच दीपक केंद्रे, पोलीस अधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी आणि ग्रामपंचायत प्रशासनाच्या उपस्थितीत झालेल्या या ग्रामसभेत महिलांनी गावाच्या सामाजिक आरोग्याच्या संरक्षणासाठी कठोर भूमिका घेतली. ग्रामसभेतील ठराव प्रशासनाकडे पाठविण्यात आला असून त्यावर पुढील निर्णयाची प्रतीक्षा आहे.
दरम्यान, दारूबंदीच्या मागणीसाठी हजारो महिलांनी दाखवलेली एकजूट ग्रामीण भागातील सामाजिक परिवर्तनाचे महत्त्वपूर्ण उदाहरण मानली जात आहे. ग्रामसभेत मंजूर झालेला ठराव प्रत्यक्षात कधी आणि कशा पद्धतीने लागू होणार, तसेच प्रशासन यावर कोणती भूमिका घेणार, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.



