अमरावतीत गुन्हे शाखेची धडक कारवाई; कोम्बिंग ऑपरेशनमध्ये ७ अट्टल गुन्हेगार धारदार शस्त्रांसह ताब्यात

अमरावती शहरात गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत अट्टल गुन्हेगारांविरोधात धडक मोहीम राबवली आहे. कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान पोलिसांनी धारदार शस्त्रांसह ७ जणांना ताब्यात घेतले आहे. पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
अमरावती शहर गुन्हे शाखेने १७ मे रोजी विविध संवेदनशील भागांत अचानक छापेमारी केली. शहरातील गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी हे विशेष कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले.
या मोहिमेदरम्यान शस्त्र बाळगणाऱ्या ७ अट्टल इसमांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपींकडून सुमारे ७ हजार रुपये किंमतीची ७ धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये रजत शशिकांत रामटेके, दर्शन विलास महल्ले, आर्यन उर्फ गौरव सुधीर नागपासे, साहिल उमेश चव्हाण, रुपेश अंबादास शिंगाडे, अनिकेत बाळू दुर्योधन आणि हसन खा राजे खा यांचा समावेश आहे.
पोलिसांनी या संशयितांवर आधीपासूनच नजर ठेवली होती. अचानक टाकलेल्या धाडीमुळे अनेकांना पळून जाण्याची संधी मिळाली नाही. कारवाईनंतर संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
या धडक कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारीवर मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांच्या या अॅक्शनमुळे गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शहरातील नागरिकांनीही या मोहिमेचे स्वागत केले आहे.
अमरावती पोलिसांच्या या कारवाईची शहरभर चर्चा सुरू असून गुन्हेगारांविरोधातील अशाच मोहीमा पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.



