काटोलजवळ विटांनी भरलेला ट्रक उलटला; मोवाडच्या तीन मजुरांचा जागीच मृत्यू, तीन गंभीर जखमी

काटोलजवळील इसापूर परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. विटांनी भरलेला ट्रक उलटून झालेल्या भीषण अपघातात मोवाड येथील तीन मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे अपघातावेळी हे सर्व मजूर ट्रकच्या केबिनमध्ये झोपेत होते. चालकाच्या निष्काळजीपणामुळे तीन कष्टकरी कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मंगळवार, १९ मे रोजी काटोलजवळील इसापूर अर्थात झिल्पा गावाजवळ हा भीषण अपघात घडला. विटांनी भरलेला आयशर ट्रक खापा येथून सावनेरमार्गे मोवाडकडे जात होता. मात्र अचानक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रक रस्त्यावरून घसरून थेट उलटला.
अपघातावेळी ट्रकमधील मजूर केबिनमध्ये गाढ झोपेत होते. ट्रक पलटी होताच त्यांना सावरण्याची संधीही मिळाली नाही. या भीषण अपघातात संजय सुदाम कनेरे, लीलाधर विष्णू वालूलकर आणि अजित नीलकंठ भलावी या तिघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
तर राजेंद्र राजगुरू, हेमराज लक्ष्मण कन्हेरे आणि सुभाष जयराम धुर्वे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर काटोल येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेनंतर ट्रक चालक आणि मालक प्रवीण ऊर्फ गोलू बले हा घटनास्थळावरून फरार झाला. माहिती मिळताच काटोल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांनी मदतकार्य करत जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले.
एकाच गावातील तीन कष्टकरी मजुरांचा मृत्यू झाल्याने मोवाड गावावर शोककळा पसरली आहे. कष्टाची भाकर कमवण्यासाठी निघालेल्या या मजुरांचा प्रवासच अखेरचा ठरला आणि काही क्षणांत तीन कुटुंबांचा आधार कायमचा हरपला.
या भीषण अपघातामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. फरार चालकाचा शोध पोलिसांकडून सुरू असून अपघाताचे नेमके कारण काय, याचा तपास करण्यात येत आहे.
मृत मजुरांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून या घटनेने संपूर्ण परिसर शोकमग्न झाला आहे.



