citynewsLatest NewsMaharashtra

ज्ञानासोबत सामाजिक मूल्ये आत्मसात करा; विद्यार्थ्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

चेंबूर येथील श्री नारायण गुरु महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

मुंबई : शिक्षण हे समाज आणि राष्ट्रनिर्मितीचे प्रभावी माध्यम असून विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकातील ज्ञानच नव्हे तर सामाजिक मूल्ये, नैतिकता आणि जबाबदारीची जाणीवही आत्मसात केली पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

चेंबूर येथील श्री नारायण गुरु हायस्कूलच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आणि श्री नारायण मंदिर समितीच्या ६२ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याच कार्यक्रमात त्यांच्या हस्ते श्री नारायण गुरु महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले.

श्री नारायण गुरुंचा संदेश आजही प्रेरणादायी

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “शिक्षित बना, ज्ञान मिळवा आणि सक्षम व्हा” हा श्री नारायण गुरु यांचा संदेश आजही तितकाच प्रेरणादायी आणि मार्गदर्शक आहे. समाजातील वंचित घटकांना शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम करण्याचे त्यांचे कार्य आजच्या पिढीसाठी आदर्शवत आहे.

६२ वर्षांची उल्लेखनीय वाटचाल

गेल्या सहा दशकांहून अधिक काळात श्री नारायण मंदिर समितीने शिक्षण, सामाजिक सेवा, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. महाराष्ट्रातील विविध भागांत शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक केंद्रांच्या माध्यमातून संस्थेने ज्ञानाचा प्रसार केला आहे.

आधुनिक सुविधांनी सुसज्ज नवी इमारत

नवीन महाविद्यालयीन इमारतीत आधुनिक स्मार्ट क्लासरूम, संगणक प्रयोगशाळा, विज्ञान लॅब आणि कौशल्य विकास केंद्र उभारण्यात आले आहेत. या सुविधांमुळे विद्यार्थ्यांना अधिक गुणवत्तापूर्ण आणि स्पर्धात्मक शिक्षण मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.

शासनाकडून सहकार्याची ग्वाही

संस्थेच्या विकासासाठी राज्य शासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य दिले जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. तसेच संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वाटचालीबद्दल पदाधिकारी, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी आणि पालकांचे अभिनंदन केले.

मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमाला माजी खासदार राहुल शेवाळे, संस्थेचे अध्यक्ष एम. आय. दामोदरन, चेअरमन एन. मोहनदास, सरचिटणीस ओ. के. प्रसाद, एस. चंद्राबाबू, प्राचार्या लेजा श्रीरत्नन, शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि श्री नारायण मंदिर समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button