AmravaticitynewsLatest NewsMaharashtra

मनपा आयुक्त वर्षा लड्डा अॅक्शन मोडमध्ये; अतिक्रमणाविरोधात धडक कारवाई, ११ जनावरे आणि ६ बोकड जप्त

अमरावती महानगरपालिकेच्या मालकीच्या जागांवरील अतिक्रमणांविरोधात प्रशासनाने आता थेट मोहीम हाती घेतली आहे. मनपा आयुक्त वर्षा लड्डा यांनी स्वतः नागपुरी गेट, ट्रान्सपोर्ट मार्केट, अग्निशमन केंद्र आणि हबीब नगर परिसराची पाहणी करत संबंधित विभागांना कडक निर्देश दिले. या कारवाईदरम्यान मनपाच्या ओपन स्पेसवर अनधिकृतपणे बांधून ठेवलेली ११ जनावरे आणि ६ बोकड जप्त करण्यात आले.

हबीब नगर परिसरातील महानगरपालिकेच्या जागेवर बेकायदेशीररित्या कंपाउंड उभारून त्यामध्ये जनावरे ठेवण्यात आल्याचे पाहणीदरम्यान आढळून आले. ही बाब निदर्शनास येताच आयुक्त वर्षा लड्डा यांनी संबंधित जनावरे तात्काळ जप्त करण्याचे आदेश दिले. त्यानुसार जनावरे महानगरपालिकेच्या गौरक्षण केंद्रात हलविण्यात आली आणि अतिक्रमण हटविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.

यावेळी आयुक्तांनी अतिक्रमणधारकांना स्पष्ट इशारा दिला की, महानगरपालिकेच्या जागांवरील अतिक्रमणे स्वतःहून हटवावीत, अन्यथा जप्ती आणि कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल.

पाहणीदरम्यान अग्निशमन केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची आणि कामकाजाची तपासणी करण्यात आली. कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने काम करावे आणि कोणतीही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

स्वच्छता विभागालाही त्यांनी फटकारले. शहरातील सर्व भाग स्वच्छ ठेवण्याचे आदेश देत रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. “सध्याचे काम समाधानकारक नाही. प्रत्येक अधिकाऱ्याने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी,” अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

या पाहणीदरम्यान अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, डॉ. अजय जाधव, मनोज शहाळे, मंगेश कडू, विवेक देशमुख, अजय विंचुरकर, योगेश कोल्हे, भूषण पुसदकर आणि राजेश राठोड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

या कारवाईतून मनपा प्रशासनाने अतिक्रमणांविरोधात कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. आता या मोहिमेचा शहरातील इतर अनधिकृत बांधकामांवर कितपत परिणाम होतो, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button