नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या बोधचिन्हाचे अनावरण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोगोचे लोकार्पण

मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अधिकृत बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या भव्य धार्मिक सोहळ्याच्या तयारीला यानिमित्ताने अधिकृत सुरुवात झाल्याचे मानले जात आहे.
कुंभमेळा प्राधिकरण, ‘मायगव्ह’ आणि ‘असोसिएशन ऑफ Designers of India’ यांच्या संयुक्त विद्यमाने देशव्यापी लोगो स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला देश-विदेशातून तब्बल 3,067 प्रवेशिका प्राप्त झाल्या. त्यामध्ये 70 आंतरराष्ट्रीय स्पर्धकांचाही समावेश होता.
या स्पर्धेत पुण्यातील सुमित काटे यांनी प्रथम क्रमांक पटकावत 3 लाख रुपयांचे पारितोषिक मिळवले. नोएडाचे मयांक नायक यांनी द्वितीय क्रमांक मिळवत 2 लाख रुपये, तर पंढरपूरचे पीयूष पिंपळनेरकर यांनी तृतीय क्रमांक पटकावत 1 लाख रुपयांचे पारितोषिक जिंकले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विजेत्यांचा सन्मान करण्यात आला.
या लोगोची निवड प्रसून जोशी, अश्विनी देशपांडे, मंदार राणे, वृषाली केकणे-देशमुख यांसारख्या नामांकित डिझाइन तज्ज्ञांच्या समितीने केली. सर्जनशीलता, नाविन्य, ब्रँड सुसंगतता आणि सादरीकरण या निकषांवर आधारित अंतिम निवड करण्यात आली.
बोधचिन्हाची वैशिष्ट्ये
नवीन बोधचिन्हात नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या धार्मिक व सांस्कृतिक परंपरेचे प्रभावी चित्रण करण्यात आले आहे.
- भगवान शंकराचे त्रिशूळ — आध्यात्मिक ऊर्जा आणि शिवतत्त्वाचे प्रतीक
- त्र्यंबकेश्वर मंदिराची प्रतिमा — प्रादेशिक वारशाचे दर्शन
- काळाराम मंदिराची कमान
- गोदावरी नदीला शिवलिंगाच्या रूपात दर्शविणारा डिझाइन घटक
या बोधचिन्हातून सिंहस्थ कुंभमेळ्याची आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरा प्रभावीपणे मांडण्यात आली आहे.
या कार्यक्रमाला कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, मंत्री छगन भुजबळ, दादाजी भुसे, उदय सामंत, शिवेंद्रसिंहराजे भोसले, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांच्यासह विविध आखाड्यांचे साधू-संत उपस्थित होते.
2027 मध्ये होणारा नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा हा जगातील सर्वात मोठ्या धार्मिक मेळाव्यांपैकी एक असणार आहे. त्याच्या अधिकृत बोधचिन्हाच्या अनावरणाने या भव्य आयोजनाच्या तयारीला औपचारिक सुरुवात झाली आहे.



