अमरावतीत गॅस वितरणावर नागरिकांचा संताप; लक्ष्मी गॅस एजन्सीवर ब्लॅक मार्केटिंगचे गंभीर आरोप

अमरावती शहरातील रुक्मिणी नगर परिसरात लक्ष्मी गॅस एजन्सीविरोधात नागरिकांचा संताप उसळला. ऑनलाइन बुकिंग करूनही घरपोच गॅस सिलिंडर वेळेवर मिळत नसल्याचा आरोप करत शेकडो नागरिकांनी एजन्सीसमोर गर्दी करून जोरदार घोषणाबाजी केली. काही नागरिकांनी तर बुकिंग झालेल्या सिलिंडरची ब्लॅकमध्ये विक्री होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनेक ग्राहकांना गॅस बुकिंग यशस्वी झाल्याचा संदेश मोबाईलवर प्राप्त होतो. मात्र त्यानंतर अनेक दिवस सिलिंडर घरपोच पोहोचत नाही. एजन्सीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यास समाधानकारक उत्तर मिळत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली.
या पार्श्वभूमीवर बुधवारी महिला, ज्येष्ठ नागरिक आणि कामगार वर्गासह शेकडो नागरिक थेट लक्ष्मी गॅस एजन्सी कार्यालयाबाहेर जमा झाले. यावेळी संतप्त नागरिक आणि एजन्सी प्रतिनिधींमध्ये जोरदार बाचाबाची झाली. “आमच्या नावावर बुकिंग दाखवून सिलिंडर इतरांना जास्त दराने विकले जात आहेत,” असा आरोप काही ग्राहकांनी केला.
परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि संबंधित प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. नागरिकांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
गॅससारख्या अत्यावश्यक सेवेत होत असलेल्या कथित अनियमिततेमुळे वितरण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वेळेवर सिलिंडर न मिळाल्याने अनेक कुटुंबांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
आता प्रशासन या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून ब्लॅक मार्केटिंगच्या आरोपांची सत्यता पडताळून पाहते का, आणि नागरिकांना दिलासा मिळतो का, याकडे संपूर्ण अमरावतीचे लक्ष लागले आहे.



