“फाईल्स अडकल्या, कामं रखडली!” अमरावती मनपेत आयुक्त वर्षा लड्डांचा सरप्राईज धडक दौरा

अमरावती महानगरपालिकेत आज अचानक खळबळ उडाली…
कारण आयुक्त वर्षा लड्डा स्वतः प्रशासनाचा आढावा घेण्यासाठी मैदानात उतरल्या!
गुरुवारी झालेल्या या अचानक पाहणीमुळे मनपातील अनेक विभाग अॅक्शन मोडवर आले.
अमरावती महानगरपालिका मुख्यालय…
शहराच्या प्रशासनाचं केंद्र…
जिथून शहराच्या विकासाचा कारभार चालतो…
मात्र आज इथलं वातावरण काहीसं वेगळंच पाहायला मिळालं.
आयुक्त वर्षा लड्डा यांनी नगर रचना, बांधकाम, प्रकाश, आरोग्य, स्वच्छता, उद्यान, कर विभाग अशा विविध विभागांना अचानक भेट देत कामकाजाची प्रत्यक्ष तपासणी केली.
प्रलंबित फाईल्स, कार्यालयीन शिस्त, कामांची गती आणि विभागांतील समन्वय यावर त्यांनी बारकाईने नजर टाकली.
पाहणीदरम्यान काही विभागांमध्ये फाईल्स अनावश्यकपणे प्रलंबित असल्याचं आढळून आलं…
तर काही ठिकाणी कामांची गती अत्यंत मंद असल्याचंही स्पष्ट झालं.
काही विभागांमध्ये व्यवस्थापन आणि समन्वयात सुधारणा आवश्यक असल्याचे संकेतही यावेळी मिळाले.
यावेळी आयुक्तांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत आदेश दिले —
👉 कामं वेळेत पूर्ण झालीच पाहिजेत
👉 फाईल्स विनाकारण प्रलंबित राहता कामा नयेत
👉 विभागांमध्ये समन्वय वाढवावा
👉 नागरिकांच्या कामांना प्राधान्य द्यावं
तसेच स्वच्छता, उपस्थिती नोंदवही, दस्तऐवजांची जपणूक आणि डिजिटल कामकाजाचीही सखोल तपासणी करण्यात आली.
शहरातील सुरू असलेल्या विकासकामांचा आणि आगामी प्रकल्पांचाही आढावा घेत कामांना गती देण्याचे निर्देश देण्यात आले.
“प्रशासन अधिक पारदर्शक, शिस्तबद्ध आणि कार्यक्षम करण्यासाठी मनपा कटिबद्ध आहे,” असं आयुक्त वर्षा लड्डा यांनी यावेळी स्पष्ट केलं.
या धडक पाहणीमुळे आता मनपाच्या कामकाजात खरोखरच बदल होणार का…?
की ही कारवाई केवळ कागदावरच मर्यादित राहणार…?
याकडे संपूर्ण अमरावतीकरांचं लक्ष लागलं आहे.
अमरावतीकरांची अपेक्षा आता एकच —
“फक्त पाहणी नको… तर प्रत्यक्ष कामात बदल हवा!”



