अकोल्यात 10 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; 60 वर्षीय शेजारी फरार, पोलिसांची 4 पथके शोधात

अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातून मानवतेला काळीमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे.
आई-वडील मजुरीसाठी शेतात गेले असताना 60 वर्षीय शेजाऱ्याने 10 वर्षांच्या निष्पाप मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पातूर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात ही घटना घडली. पीडित मुलीचे आई-वडील शेतमजूर असून ते नेहमीप्रमाणे मजुरीसाठी बाहेर गेले होते. याच संधीचा फायदा घेत शेजारी राहणाऱ्या 60 वर्षीय आरोपीने मुलीला धमकावत गेल्या चार ते पाच दिवसांपासून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप आहे.
भीतीमुळे चिमुकली काही दिवस गप्प राहिली. मात्र अत्याचाराची तीव्रता वाढल्यानंतर तिने धीर करून आपल्या आई-वडिलांना संपूर्ण प्रकार सांगितला. मुलीकडून ही माहिती मिळताच कुटुंबीयांनी तातडीने चान्नी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपीविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. मात्र, पोलिसांचे पथक पोहोचण्यापूर्वीच आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.
या प्रकरणी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी सांगितले की, आरोपी आणि पीडित कुटुंब शेजारी राहत होते. दोन्ही कुटुंबांमध्ये चांगले संबंध असतानाही आरोपीने हे घृणास्पद कृत्य केल्याचे समोर आले आहे. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची तीन ते चार विशेष पथके रवाना करण्यात आली असून तो जवळच्या जंगलाच्या दिशेने पळाल्याची माहिती मिळाली आहे.
सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांनी नागरिकांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे.
या घटनेनंतर संपूर्ण पातूर तालुक्यात संताप व्यक्त होत असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
महिला आणि बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, अशा विकृत प्रवृत्तींवर कठोर आणि तातडीची कारवाई होणे गरजेचे असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
