बुलढाण्यात घटस्फोटित पत्नीवर पहिल्या पतीचा चाकू हल्ला; सामान आणि मुलाला आणण्यासाठी गेल्यावर रक्तरंजित हल्ला

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा शहरात एक धक्कादायक आणि रक्तरंजित घटना समोर आली आहे. घरगुती सामान आणि स्वतःच्या मुलाला आणण्यासाठी पहिल्या पतीच्या घरी गेलेल्या एका घटस्फोटित महिलेवर तिच्याच पहिल्या पतीने धारदार चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रिजवान शेख मंजूर आणि नाझिया परवीन हे पती-पत्नी काही महिन्यांपूर्वीच विभक्त झाले होते. घटस्फोटानंतर नाझिया परवीन यांनी शेख शाबीर मोहम्मद शाबीर यांच्यासोबत पुनर्विवाह केला. दुसऱ्या विवाहानंतर नाझिया आणि त्यांचे पती छत्रपती संभाजीनगर येथे वास्तव्यास होते.
घटस्फोटानंतरही नाझिया यांचे काही घरगुती सामान आणि त्यांचा मुलगा पहिल्या पतीकडे म्हणजेच रिजवान शेख याच्याकडे सिंदखेड राजा येथेच होता. हे उर्वरित सामान आणि आपल्या मुलाला घेण्यासाठी नाझिया परवीन सिंदखेड राजा येथे पहिल्या पतीच्या घरी गेल्या होत्या.
मात्र, घरात पोहोचताच जुन्या रागातून रिजवान शेख याने नाझिया यांच्यावर धारदार चाकूने सपासप वार करत जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात रिजवानच्या इतर दोन नातेवाईकांनीही त्याला साथ दिल्याचा आरोप आहे.
या प्राणघातक हल्ल्यात नाझिया परवीन गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेनंतर नाझिया यांचे दुसरे पती शेख शाबीर यांनी सिंदखेड राजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून सिंदखेड राजा पोलिसांनी रिजवान शेख आणि त्याला साथ देणाऱ्या आणखी दोन नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
भरदिवसा घडलेल्या या थरारक हल्ल्यामुळे सिंदखेड राजा परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. फिर्यादी शेख शाबीर यांनी तिन्ही आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. सध्या सिंदखेड राजा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.



