खोलापूरमध्ये महिलेची भरदिवसा छेडछाड; संतप्त नागरिकांचा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा, अट्रॉसिटी अंतर्गत गुन्ह्याची मागणी

महाराष्ट्रात महिला सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. खोलापूरमध्ये एका महिलेची भरदिवसा छेडछाड झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, या प्रकरणानंतर संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले आहे.
३० एप्रिल रोजी खोलापूर पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या या घटनेने परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पीडित महिला आपल्या घराशेजारी फिरायला गेली असताना चार आरोपींनी तिची छेडछाड केल्याचा गंभीर आरोप आहे.
या प्रकारानंतर महिलेच्या पतीने आरोपींना जाब विचारला असता, आरोपींनी उलट पीडितेच्या पती, दीर आणि सोबत असलेल्या दुसऱ्या महिलेला मारहाण केली. तसेच शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच खोलापूर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सर्व आरोपींना अटक केली. मात्र, ही कारवाई अपुरी असल्याची भावना व्यक्त करत नागरिकांनी अधिक कठोर कारवाईची मागणी केली आहे.
या पार्श्वभूमीवर विदर्भ खाटीक समाज सेवा समितीच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत आरोपींवर अट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची ठाम मागणी केली.
या प्रकरणात खासदार डॉ. अनिल बोंडे यांनीही पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांची भेट घेत आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच प्रकरणाचा निष्पक्ष आणि कडक तपास व्हावा, असे निर्देशही दिले.
या आंदोलनात सुधीर लसनकर, राजाभाऊ लोयटे, अशोक पारडे, सुरेश वानखडे यांच्यासह समाजातील अनेक बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असताना प्रशासनाने अशा प्रकरणांमध्ये तात्काळ, कठोर आणि संवेदनशील कारवाई करणे गरजेचे असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. आता या प्रकरणात पुढे कोणती ठोस कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



