citynewsCrime NewsLatest NewsMaharashtra

खोलापूर छेडछाड प्रकरणाने संताप; विदर्भ खाटीक समाज सेवा समितीचे पोलीस अधीक्षक कार्यालयावर आंदोलन

खोलापूरमध्ये महिलेच्या छेडछाडीच्या घटनेनंतर संतापाची लाट उसळली असून, विदर्भ खाटीक समाज सेवा समितीने थेट पोलीस अधीक्षक कार्यालय गाठत जोरदार आंदोलन छेडले. आरोपींवर कडक कारवाईसह अट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची ठाम मागणी यावेळी करण्यात आली.

खोलापूर पोलीस स्टेशन हद्दीत ३० एप्रिल रोजी घडलेल्या या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पीडित महिला आपल्या घराशेजारी फिरायला गेली असताना चार आरोपींनी तिची छेडछाड केल्याचा गंभीर आरोप आहे.

या प्रकारानंतर महिलेच्या पतीने आरोपींना जाब विचारला असता, आरोपींनी उलट पती, दीर आणि संबंधित महिलेलाच मारहाण केली. यावेळी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकीही देण्यात आल्याचा आरोप आहे.

घटनेची माहिती मिळताच खोलापूर पोलिसांनी तातडीने कारवाई करत सर्व आरोपींना अटक केली. मात्र, केवळ अटकेवर समाधान नसून आरोपींवर अधिक कठोर कलमे लावावीत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

याच पार्श्वभूमीवर विदर्भ खाटीक समाज सेवा समितीच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

आंदोलकांनी स्पष्ट मागणी केली —
👉 आरोपींवर अट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करावा
👉 आरोपींना कठोरात कठोर शिक्षा द्यावी

दरम्यान, या प्रकरणात खासदार डॉ. अनिल बोंडे यांनीही पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांची भेट घेत आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. तसेच या प्रकरणात निष्पक्ष आणि कठोर तपास व्हावा, असे निर्देश दिल्याची माहिती समोर आली आहे.

या आंदोलनात सुधीर लसनकर, राजाभाऊ लोयटे, अशोक पारडे, सुरेश वानखडे यांच्यासह खाटीक समाजातील अनेक बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

खोलापूरमधील या घटनेनंतर महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी अधिक तीव्र होत आहे. आता या प्रकरणात पोलिस पुढे कोणती ठोस कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button