अमरावतीत उष्णतेचा पहिला बळी? 46.6 अंश तापमानात वृद्धाचा संशयित उष्माघाताने मृत्यू

अमरावतीत उष्णतेचा कहर दिवसेंदिवस वाढत असून, आता या प्रचंड उष्णतेने पहिला बळी घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तब्बल 46.6 अंश सेल्सिअस तापमानात एका वृद्धाचा संशयित उष्माघाताने मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अमरावती शहरात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची लाट तीव्र झाली आहे. तापमानाने 46.6 अंश सेल्सिअसचा उच्चांक गाठल्याने नागरिकांचे जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. दुपारच्या वेळेत रस्ते ओस पडत असून, उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत.
दरम्यान, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रुग्णालयाच्या मागील बाजूस सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी 70 ते 75 वर्षीय अज्ञात वृद्धाचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच शहर कोतवाली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. प्राथमिक माहितीनुसार, प्रचंड उष्णता आणि कडक उन्हामुळे या वृद्धाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.
सध्या पोलिसांकडून मृताची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू असून, या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे.
दरम्यान, अमरावतीत वाढत्या तापमानामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दुपारच्या वेळेत शक्यतो घराबाहेर पडू नये, पुरेसे पाणी प्यावे, डोक्यावर कापड किंवा टोपी वापरावी आणि उन्हात काम करणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
अमरावतीत उष्णतेचा धोका दिवसेंदिवस वाढत असताना ही घटना गंभीर इशारा देणारी ठरत आहे. उष्णतेकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे परिणाम जीवघेणे ठरू शकतात, त्यामुळे नागरिकांनी स्वतःची काळजी घेणे आता अत्यावश्यक बनले आहे.



