गाडगेनगर पोलिसांची मोठी कारवाई, अट्टल चोराकडून चोरीची बाइक जप्त

अमरावती शहरातील गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीत अट्टल मोटरसायकल चोरावर डि.बी. पथकाने मोठी कारवाई करत चोरीची मोटरसायकल जप्त केली आहे.
फिर्यादी प्रविण राजेंद्र इंगळे, वय ३२ वर्ष, रा. नारायणपूर, ता. अचलपूर यांची स्प्लेंडर प्लस मोटरसायकल दिनांक १७ मार्च २०२६ रोजी दुपारी २ ते सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या पार्किंगमधून चोरीला गेली होती. या प्रकरणी गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २९१/२०२६ नोंदविण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांना मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी गौरव विठ्ठल ढोणे, वय ३० वर्ष, रा. म्हैसपूर, ता. दर्यापूर याची ओळख पटली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली.
आरोपीने चोरीची मोटरसायकल शिंगणवाडी येथील शेतात बनावट नंबर प्लेट लावून लपवून ठेवल्याची माहिती दिली. त्यानुसार डि.बी. पथकाने पंचांसमक्ष घटनास्थळी जाऊन मोटरसायकल जप्त केली.
ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपआयुक्त गणेश शिंदे, सहायक पोलीस आयुक्त शिवाजीराव बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
गाडगेनगर डि.बी. पथक प्रमुख पोउपनि. सागर ठाकरे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी ही यशस्वी कारवाई केली आहे.



