अमरावतीत वृद्धाश्रमात आध्यात्मिक सेवा कार्यक्रम; वृद्धांमध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार

अमरावती प्रतिनिधी—
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त समाजसेवक चंद्रकुमार जाजोदिया उर्फ लप्पीभैया आणि त्यांच्या टीमच्या वतीने मातोश्री वृद्धाश्रमात विशेष आध्यात्मिक आणि सेवा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात सत्तरहून अधिक वृद्धजन सहभागी झाले होते. पंढरपूरहून आलेल्या इस्कॉनचे संत पूज्य मधुपती दास महाराज यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. एकादशीच्या पवित्र दिवशी त्यांनी एकादशीचे महत्त्व, हिंदुत्वाची भावना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सेवा, समर्पण व राष्ट्रनिर्मितीतील योगदान याविषयी सविस्तर विवेचन केले.
कार्यक्रमादरम्यान भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीत आरती करण्यात आली. तसेच उपस्थित सर्व वृद्धांना श्रीकृष्णाच्या बालरूपाचे चित्र स्मृतिचिन्ह म्हणून देण्यात आले. “भगवान श्रीकृष्ण नेहमी तुमच्या सोबत आहेत, त्यांच्या स्मरणाने जीवनात शक्ती आणि शांती मिळते,” असे महाराजांनी सांगितले.
या उपक्रमात आश्रमाचे संचालक सरोज राऊत, विजय राऊत आणि नंदा बहन उगले यांचे विशेष सहकार्य लाभले. सेवा प्रकल्पाचे अध्यक्ष राजन आडतिया होते. लप्पीभैयांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
यावेळी अनिकेत जोशी, क्षितिज धुनंदी, अमित जाजोदिया, विकास केजरीवाल, रोशन गुप्ता, गौरव लूणावत आणि प्रथमेश अढाऊ उपस्थित होते.
या कार्यक्रमामुळे वृद्धांमध्ये आध्यात्मिक जागरूकता, सकारात्मक ऊर्जा आणि आत्मविश्वास वाढल्याचे चित्र पाहायला मिळाले.



